गोलरक्षक श्रीजेशच्या दुखापतीची चिंता

दक्षिण कोरियाविरुद्धच्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत अनुभवी गोलरक्षक पी.आर. श्रीजेशची दुखापत हीच भारतापुढील मुख्य समस्या आहे. श्रीजेश याच्याबरोबरच सुरेंदरकुमार हा बचाव फळीतील खेळाडूही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे भारतीय संघासमोरील पेच वाढला आहे. भारताने २०११ मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. यंदाच्या स्पर्धेत भारत व कोरिया यांच्यातील साखळी सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. भारताने साखळी गटात अव्वल स्थान पटकावले होते. कोरियाच्या संघात युवा खेळाडूंचा अधिकाधिक भरणा असून प्रत्येक सामन्यानंतर त्यांच्या कामगिरीत सुधारणा दिसून आली आहे.

भारताचे प्रशिक्षक रोलँन्ट ओल्टमन्स यांनी सांगितले की, कोरियाच्या खेळाडूंना कमी लेखून चालणार नाही. ते जिगरबाज खेळाडू असून कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. त्यांचा बचाव भक्कम असून त्यांना भेदत आपले खेळाडू कसे आक्रमण करतात यावरच सामन्याचे यश अवलंबून आहे.

श्रीजेशच्या दुखापतीबाबत ओल्टमन्स म्हणाले की, श्रीजेश हा कोरियाविरुद्ध खेळू शकेल अशी मला खात्री आहे. जर तो खेळू शकला नाही तर आकाश चिकटे याच्याकडे गोलरक्षणाची जबाबदारी सोपविली जाईल. तोदेखील अव्वल दर्जाचा गोलरक्षक आहे. त्याने येथे अगोदरच्या दोन सामन्यांमध्ये सुरेख गोलरक्षण केले आहे. उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाशी गाठ पडेल अशीच आम्ही अपेक्षा केली होती. मात्र साखळी सामन्यातच आम्ही त्यांच्यावर मात केली. कोरियाविरुद्धच्या उपांत्य लढतीबाबत मी अद्याप व्यूहरचना केलेली नाही.

  • सामन्याची वेळ : दुपारी ३.४५ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ४ व स्टार स्पोर्ट्स ४ एचडी