थंड हवेच्या ठिकाणी किंवा समुद्रकिनारी घोडय़ावर रपेट मारणे सर्वानाच आवडते. मात्र घोडय़ांचा शौक जोपासणे आर्थिकदृष्टय़ा सधन वर्गापुरते मर्यादित. त्यामुळे अश्वारोहण या खेळावरही धनाढय़ मंडळींचा पगडा होता. घोडदळ हा लष्कराचा अविभाज्य घटक आहे. मात्र घोडय़ांची आवड असलेले आणि त्याकरिता सढळ हस्ते पैसा खर्च करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढल्याने या खेळाला नवा आयाम मिळाला आहे. इन्चॉन नगरीत सुरू झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा अश्वारोहण संघ सहभागी होत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय अश्वारोहण विश्वाचा घेतलेला वेध-
अश्वारोहण शर्यतीसाठी घोडय़ांचा दर्जा हा निर्णायक मुद्दा आहे. जागतिक स्पर्धामध्ये अशक्त आणि कृश घोडय़ांसाठी भारतीय खेळाडूंची थट्टा केली जात असे. स्पर्धात्मक उपयोगासाठी उपयुक्त अशा घोडय़ांच्या प्रजाती विविध देशांमध्ये आहेत. या प्रजातींचे घोडे भारतात आयात करून त्यांच्या आधारे खेळ रुजवण्याचा आणि विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्वारोहणात पदकाचे आशास्थान असलेली श्रुती व्होरा ही बिर्ला घराण्यातील. जर्मनीतून आयात घोडय़ासाठी तिने तब्बल चार कोटी रुपये खर्च केले आहेत. एमबीए शिक्षणातून वेळ काढून श्रुती नामवंत प्रशिक्षक रिइनर क्लिमके यांच्या मार्गदर्शनाखाली सरावासाठी जर्मनीला रवाना झाली होती. श्रुतीचे भारतीय संघातील सहकारी बंगळुरू येथील एम्बसी रायडिंग स्कूलचे विद्यार्थी आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या धनाढय़ जितू वीरवानी यांच्या अकादमीत नाडिया हरिदास, अजाय अपाच्चू आणि फौआद मिर्झा इन्चॉनमध्ये आपले कौशल्य अजमावणार आहेत.
‘‘फॉम्र्युला-वन र्शयतीप्रमाणे या खेळाला आर्थिक झळाळी मिळाली आहे. घोडय़ांचा दर्जा सुधारल्यामुळे हे शक्य झाले आहे. अश्वारोहणाची आवड असणाऱ्या सधन वर्गातील शर्यतपटूंच्या प्रवेशाने सगळी समीकरणे बदलली आहेत. खासगी स्वरूपात निधी उभा होत असल्याने परिस्थिती बदलली आहे,’’ असे अश्वारोहण प्रशिक्षक समीर लंबा यांनी सांगितले. ‘‘घोडय़ांच्या प्रशिक्षणासाठी दिवसाला २० हजार रुपये रक्कम खर्च करावी लागते. उत्तम दर्जाच्या घोडय़ांची परदेशातून आयात केल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण वर्चस्व गाजवू शकणार नाही,’’ असे लंबा यांनी स्पष्ट केले.
‘‘आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या दक्षिण कोरियाने अश्वारोहणासाठी एक सूत्र विकसित केले आहे. कोणत्याही मोठय़ा स्पर्धेच्या वर्षभर आधी ते घोडय़ांची खरेदी करतात. त्यांच्याआधारे सराव करतात. स्पर्धेत जेतेपद पटकावतात. स्पर्धेनंतर ते या घोडय़ांची अवाच्या सव्वा किमतीला विक्री करतात. या सूत्रामुळे जेतेपद आणि पैसा दोन्ही कोरियाकडेच राहते,’’ असे संग्राम सिंगने सांगितले. ११ सदस्यीय भारतीय अश्वारोहण संघात लष्कराचे प्रतिनिधित्व करणारा संग्राम एकमेव खेळाडू आहे. संघाचे सरासरी ३५ वय घटून आता २२-२३ वर आले असल्याचे त्याने आवर्जून नमूद केले.
१९८२नंतरच्या प्रत्येक आशियाई स्पर्धेत भारताच्या अश्वारोहण संघाने पदक पटकावले आहे. या खेळात जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यानंतर सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. गुआंगझाऊ येथे झालेल्या शेवटच्या आशियाई स्पर्धेत तांत्रिक कारणांमुळे भारतीय संघाला प्रवेश नाकारण्यात आला होता. या वेळीही भारतीय पथक निश्चित करायला उशीर झाल्याने घोडय़ांच्या वाहतुकीसाठी ६५ लाख रुपये खर्च करावे लागले आहेत. तांत्रिक अडचणी दूर सारून भारतीय संघ पदक पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.