महिलांच्या हॉकीमध्ये धडाकेबाज सुरुवात करण्याची संधी भारताला मिळत असून सोमवारी सलामीच्या लढतीत त्यांची थायलंडशी गाठ पडणार आहे.
लागोपाठ तीन वेळा अजिंक्यपद मिळविणारा चीन, मलेशिया व थायलंड यांचा भारताच्या गटात समावेश आहे. दोन सामने जिंकल्यास उपांत्य फेरी निश्चित होणार असल्यामुळे भारतीय संघ विजयी सलामी करण्यासाठी उत्सुक असेल. संघाची कर्णधार रितू राणी ही मधल्या फळीत मोठी जबाबदारी सांभाळत असून बचावफळीत उपकर्णधार दीपिकाकुमारीवर मोठी भिस्त आहे. या दोन्ही खेळाडूंप्रमाणेच पूनम राणी, वंदना कटारिया, नवज्योत कौर व राणीकुमारी यांच्याकडूनही भारतास चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
थायलंडचा संघ बलाढय़ नसला तरी त्यांच्याकडे चिवट लढत देण्याची क्षमता आहे हे ओळखूनच भारताला या सामन्यातही सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.
२०१० च्या आशियाई स्पर्धेत भारताने त्यांचा १३-० असा धुव्वा उडविला होता.