बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकाने एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या वर्षभरात सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या जोरावर युवा जितू रायने आपल्या नावाचा ठसा उमटवला. अनुभवी अभिनव ते युवा जितू अशा दोन पिढय़ांच्या नेमबाजांवर भारताची पदकाची भिस्त असणार आहे.
वैयक्तिक व सांघिक मिळून ४४ पदकांसाठी ३४ विविध देशांच्या नेमबाजांमध्ये मुकाबला रंगणार आहे. नेमबाजीमध्येच स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरणार आहे. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल तर पुरुषांच्या ५० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिळून चार पदकांचा फैसला होणार आहे. गुआंगझाऊला झालेल्या मागील आशियाई स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी एक सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली होती. ग्रॅनडा, स्पेन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी सर्वसाधारण झाली होती.
राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेत्या व १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा जितू राय हा चीन व कोरियाचे आव्हान मोडून काढण्यासाठी सज्ज आहे. लालफितीच्या कारभारामुळे उशिरा दाखल झालेला अभिनव बिंद्रा पदकासह स्पर्धेला अलविदा करण्यासाठी उत्सुक आहे.