राष्ट्रीय संघटनेचे सचिव सुरेश शर्मा यांची घोषणा

खो-खो च्या विकासासाठी केंद्रातर्फेही सर्वेतोपरी प्रयत्न सुरू असून लवकरच भारतात केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय खो-खो संघटनेचे सचिव सुरेश शर्मा यांनी केली.

येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर बुधवारपासून आयोजित १४ वर्षांआतील २८ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना शर्मा यांनी खो-खो खेळामुळे होणारे फायदे यावेळी मांडले. उन्हापासून खेळाडूंचे संरक्षण करण्यासाठी तंबूमध्ये सामने घेण्याच्या नाशिक जिल्हा संघटनेच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले. खो-खोपटू इतर कोणताही खेळ खेळू शकतात. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल हे स्वत: उत्तम खेळाडू असल्याने त्यांनी खो-खो चा देशात अधिकाधिक प्रसार करण्याचे निर्देश दिले असून लवकरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई स्पर्धाही होणार असल्याचे शर्मा यांनी नमूद केले. महापौर रंजना भानसी यांनीही जिल्हा संघटनेने खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकात राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांनी खो-खो पुढे नेणे याच उद्देशासाठी संघटना कार्य करीत असल्याचे सांगितले. प्रत्येक स्पर्धेत नाविण्यपूर्ण संकल्पना जिल्हा संघटनेतर्फे राबविण्यात येत असून त्यास ही स्पर्धाही अपवाद नाही. सर्व खेळाडूंना गोदाकाठी जलप्रतिज्ञा देण्यात आली. विज्ञान आणि खेळाचे नाते समजावे म्हणून त्यांना काही वैज्ञानिक खेळणी भेट देण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी उत्कृष्ठ संचलनाबद्दल मणिपूरच्या संघास हेमंत पाटील यांच्याकडून रोख बक्षिस देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य संघटनेचे संयुक्त सचिव रामदास धरणे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले हेही उपस्थित होते. उद्घाटनाप्रारंभी सर्व संघांनी संचलन केले. सूत्रसंचालन उमेश आटवणे यांनी केले. २८ मेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. तंबूमध्ये होणारी ही खो-खो ची  पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व शुभम थोरात आणि साक्षी करे हे करीत आहेत.