गुरिंदरवीर सिंग, पलेंदर कुमार, मनीष आणि अक्षय जैन यांचा समावेश असलेल्या भारताच्या मिडले रिले संघाने बाजी मारताना दुसऱ्या आशियाई युवा मैदानी (अ‍ॅथलेटिक्स ) अजिंक्यपद स्पध्रेचा सुवर्ण निरोप घेतला. भारताच्या रिले संघाने १ मिनिट ५५.६२ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक  नावावर केले. चायनीज तैपेई (१:५५.७१) व हाँग काँग (१:५६.११) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

अखेरच्या दिवशी भारताने सुवर्णपदकासह प्रत्येकी एक रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. मुलांच्या भालाफेक प्रकारात रोहित यादव (७४.३० मीटर) व अविनाश यादव (७०.०९ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. या कामगिरीमुळे भारताने पदकतालिकेत तिसरे स्थान निश्चित केले. भारताने ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्यपदकासह एकूण १४ पदकांची कमाई केली. चीनने १६  पदकांसह पहिले, तर चायनीज तैपेईने १५ पदकांसह दुसरे स्थान पटकावले.