अ‍ॅथलेटिक क्लबवर २-१ अशी मात

अल्व्हारो मोराटाच्या निर्णायक गोलच्या जोरावर रिअल माद्रिदने सोमवारी अ‍ॅथलेटिक बिलबाओवर २-१ असा विजय मिळवून ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली.

अ‍ॅटलेटिको माद्रिदचा पराभवही गतविजेत्या माद्रिदच्या पथ्यावर पडला. रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात सेव्हिलाने स्टीव्हन निझोन्झीच्या एकमेव गोलच्या जोरावर अ‍ॅटलेटिकोवर १-० असा विजय मिळवला. या विजयाबरोबर सेव्हिलाने दुसरे स्थान पटकावले, तर बार्सिलोना आणि व्हिलारिअल प्रत्येकी १९ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. अ‍ॅटलेटिकोची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.

‘आम्हाला या पुढील सामन्यांत खडतर आव्हान मिळणार आहेत आणि अखेपर्यंत आम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. हा संदेश मी खेळाडूंना देऊ इच्छितो,’ असे रिअल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदीन झिदान म्हणाले.

अ‍ॅथलेटिकविरुद्धच्या लढतीत माद्रिदला अजून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. ७व्या मिनिटाला करिम बेंझेमाने माद्रिदचे गोलखाते उघडले. माद्रिदचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला आणखी एका सामन्यात गोल करण्यात अपयश आले. २७व्या मिनिटाला अ‍ॅथलेटिकच्या सॅबिनने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. पहिल्या सत्रात हा सामना बरोबरीवर ठेवण्यात अ‍ॅथलेटिक क्लबने यश मिळवले.  अखेरच्या दहा मिनिटांत सामन्याचे वातावरण अधिक तापले. ८३व्या मिनिटाला गरेथ बॅलेने अ‍ॅथलेटिकच्या खेळाडूंना चकवून मोराटाकडे चेंडू पास केला, परंतु मोराटाने अप्रतिम व्हॉलीद्वारे गोलजाळीच्या दिशेने टोलवलेला चेंडू गोलरक्षकाला अडवण्यात यश आले. मात्र, त्याला चेंडूवर ताबा मिळवता आला नाही आणि तो पुन्हा मोराटाकडे झेपावला. या वेळी कोणतीही चूक न करता मोराटाने गोल करून माद्रिदला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.