फुटबॉल विश्वात काही संघांमधील वैर सर्वश्रुत आहे. रिअल माद्रिद-बार्सिलोना, मँचेस्टर युनायटेड-मँचेस्टर सिटी ही काही प्रसिद्ध उदाहरणे. याच धर्तीवर माद्रिद सामायिक असलेल्या रिअल आणि अ‍ॅटलेटिको संघांतील द्वंद्व आता रंगू लागले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रिअल माद्रिदने अ‍ॅटलेटिकोवर मात करत जेतेपद पटकावले होते. या पराभवाची परतफेड करण्याची संधी स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने अ‍ॅटलेटिकोकडे होती. चुरशीच्या लढतीत रिअलला नमवत अ‍ॅटलेटिकोने या संधीचे सोने करत जेतेपदाची कमाई केली. मारिओ मन्झुकिक या विजयाचा शिल्पकार ठरला.
रिअल माद्रिदचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे सामन्याच्या पहिल्या सत्रातून माघार घेतली. सामना सुरू झाल्यानंतर लगेचच मन्झुकिकने सुरेख गोल करत अ‍ॅटलेटिकोचे खाते उघडले. तब्बल १५ वर्षांनंतर अ‍ॅटलेटिकोने घरच्या मैदानावर रिअल माद्रिदवर विजय मिळवला. दिएगो सिमोइन यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅटलेटिकोने मिळवलेले हे पाचवे जेतेपद आहे. रिअल माद्रिदला अँजेल डि मारिआ आणि सॅमी खेदिरा यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली. अ‍ॅटलेटिकोने आक्रमणात अँटोइन ग्रिइझमन आणि मंडझुकिक यांना आजमावले. या जोडीने हे डावपेच यशस्वी ठरवले. रिअलच्या खेळाडूंनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र अ‍ॅटलेटिकोने हे प्रयत्न हाणून पाडले आणि दिमाखदार जेतेपद पटकावले.