प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर गोल केल्याचा फायदा; बायर्न म्युनिकचा २-१ने विजय

पेप गॉर्डीओला यांच्या बायर्न म्युनिक संघाला सलग तिसऱ्यांदा युरोपियन फुटबॉल महासंघ (युएफा) चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. घरच्या मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लीग लढतीत म्युनिकने अ‍ॅटलेटिको माद्रिदवर २-१ असा विजय मिळवून गोलफरक २-२ असा बरोबरीत आणला. मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर गोल केल्याचा फायदा माद्रिदला मिळाल्याने त्यांना अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला. अँटोइने ग्रिएझमनच्या गोलला याचे श्रेय जाते.  पहिल्या लीगमध्ये माद्रिदने म्युनिकवर १-० असा विजय मिळवला होता.

झाबी अलोन्सो आणि रॉबेर्ट लेवांडोवस्कीने प्रत्येकी एक गोल करून म्युनिकला विजय मिळवून दिला, परंतु माद्रिदने ग्रिएझमनच्या गोलच्या जोरावर अंतिम फेरीवर दावेदारी सांगितली. ‘या लढतीत म्युनिकचे वर्चस्व होते, परंतु आम्ही त्यांच्या मैदानावर गोल केला आणि तोच महत्त्वाचा ठरला. आम्हाला अतिशय आनंद झाला.  आमच्यासमोर मातबर प्रतिस्पर्धी होता. बचाव आणि आक्रमणया दोन्ही गोष्टींवर आम्ही भर दिला आणि म्हणूनच आम्ही हे करू शकलो,’ असे ग्रिएझमनने सांगितले.

सामन्याच्या ३०व्या मिनिटाला अलोन्सोने यजमानांना १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी दुप्पट करण्याची आयती संधी म्युनिकला होती, परंतु थॉमल म्युलरने ती गमावली. पेनल्टीवर गोल करण्याचा त्याचा प्रयत्न माद्रिदचा गोलरक्षक जॅन ओब्लॅकने रोखला. दुसऱ्या सत्रातही असेच नाटय़ रंगले, परंतु या वेळी पारडे म्युनिकच्या बाजूने होते. माद्रिदच्या फर्नाडो टोरेसचा पेनल्टीवर गोल करण्याचा प्रयत्न म्युनिकच्या मॅन्युएल नेउएरने अडवला. तत्पूर्वी, ५३व्या मिनिटाला ग्रिएझमनने माद्रिदला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली होती. मात्र, ७४व्या मिनिटाला लेवांडोवस्कीच्या गोलने म्युनिकला २-१ अशा आघाडीवर आणले होते. टोरेसने सामन्यात बरोबरी साधण्याची संधी गमावली.

०३ : अ‍ॅटलेटिको माद्रिदने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी १९७४ आणि २०१४ साली ही मजल मारली होती.

०९ : अँटोइने ग्रिएझमनने यंदाच्या हंगामात ९ गोल करण्याचा विक्रम केला आहे. तो चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या इतिहासात अ‍ॅटलेटिको माद्रिदकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.

म्युनिक आणि माद्रिद यांच्यात दोन लीग लढतीनंतर २-२ असे समसमान गुण झाल़े  मात्र, माद्रिदने म्युनिकच्या घरच्या मैदानावर गोल केल्याने त्यांना नियमानुसार आगेकूच करण्याची संधी मिळाली.

या संघासाठी मी माझे आयुष्य दिले. मी संघर्ष केला आणि माझ्याकडून सर्वोत्तम दिले. आम्ही चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरलो असलो तरी संघाचा अभिमान आहे. आम्ही स्पध्रेत दमदार खेळ केला.

– पेप गॉर्डीओला, बायर्न म्युनिकचे प्रशिक्षक