सोरिआनोचा निर्णायक गोल; चॅम्पियन्स लीगच्या पात्रतेच्या आशा कायम

रॉबटरे सोरिआनोच्या निर्णायक गोलच्या जोरावर व्हिलारिअल क्लबने ला लिगा फुटबॉल स्पध्रेत बलाढय़ अ‍ॅटलेटिको माद्रिदवर १-० अशी मात केली. या विजयाबरोबर व्हिलारिअलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या पुढील हंगामासाठीच्या पात्रतेची आशा कायम राखली आहे.

ला लिगा स्पध्रेतील मजबूत बचावफळी असलेल्या या दोन्ही क्लबमध्ये आक्रमणपटूंचा चांगलीच कसोटी लागली. मात्र, सामना संपायला आठ मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना इटलीच्या सोरिआनोने सेड्रिक बाकाम्बूच्या पासवर गोल करत व्हिलारिअलचा विजय निश्चित केला. या विजयानंतर व्हिलारिअलने (६०) पाचव्या स्थानी झेप घेतली असून चौथ्या स्थानावर असलेल्या सेव्हिल्ला (६५) आणि त्यांच्यात पाच गुणांचे अंतर आहे.

‘‘यापूर्वी अनेकदा आम्ही असे विजय मिळवले आहेत, परंतु या वेळी पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण सामन्यात आम्ही चांगला खेळ केला. गोल करण्याचे अनेक प्रयत्नही आमच्याकडून झाले, परंतु नशिबाची साथ मिळाली नाही,’’ अशी प्रतिक्रिया अ‍ॅटलेटिकोचे प्रशिक्षक डिएगो सिमेऑन यांनी दिली.

ख्रिस्तियानो रोनाल्डोला पुन्हा विश्रांती

रिअल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी ला लिगा फुटबॉल स्पध्रेतील डेपोर्टिव्हो ला कोरूना क्लबविरुद्धच्या लढतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी झालेल्या एल क्लासिको सामन्यात बार्सिलोनाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर झिदान यांनी घेतलेल्या या निर्णयाने सर्वाना बुचकळ्यात टाकले आहे.

ला लिगा स्पध्रेत सलग तिसऱ्यांदा प्रतिस्पर्धी क्लबच्या मैदानावर रोनाल्डोला विश्रांती देण्यात आली आहे. याआधी रोनाल्डोच्या अनुपस्थितीत युरोपियन विजेत्या माद्रिदने लेगानेस व स्पोर्टिग गिजॉनवर विजय मिळवले आहेत. रोनाल्डोव्यतिरिक्त बुधवारी होणाऱ्या या लढतीत गॅरेथ बॅले व कर्णधार सर्गिओ रामोस यांना अनुक्रमे दुखापती आणि निलंबनामुळे मुकावे लागणार आहे. तसेच मध्यरक्षक टोनी क्रुसलाही विश्रांती देण्यात आली आहे. राफील व्हॅरेन एका महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.