ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील दिवस-रात्र कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही फलंदाजांची दाणादाण उडण्याचे सत्र कायम राहिले. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे आठ, तर न्यूझीलंडचे पाच असे एकूण १३ फलंदाज माघारी परतले. न्यूझीलंडच्या २०२ धावांच्या प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने पीटर नेव्हिल (६६), नॅथन लियॉन (३४) आणि मिचेल स्टार्क (२४) यांच्या चिवट खेळाच्या जोरावर २२ धावांची आघाडी घेतली. त्यामुळे सामन्यावर वर्चस्व गाजवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या न्यूझीलंडची निराशा झाली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा फोल ठरली आणि त्यांचा निम्मा संघ ११६ धावांत माघारी परतला. दिवसअखेर त्यांना ९४ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले.
पीटर नेव्हिल आणि लियॉन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यांनी ९व्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून डग ब्रासवेलने सर्वाधिक तीन बळी टिपले, दुसऱ्या डावात सावध खेळ करून मोठी धावसंख्या उभारण्याचे न्यूझीलंडचे मनसुबे जोश हेझलवूड आणि मिचेल मार्श यांनी उधळून लावले.