सुरक्षिततेच्या कारणास्तव निर्णय;  आर्यलडला स्पर्धेत समाविष्ट करण्याचा आयसीसीचा निर्णय

बांगलादेशमधील सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने ऑस्ट्रेलियाने १९ वर्षांखालील विश्वचषकातून माघार घेतली आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा वरिष्ठ राष्ट्रीय संघ बांगलादेशचा दौरा करणार होता. मात्र दौरा सुरू होण्यापूर्वी बांगलादेशमध्ये विदेशी नागरिकांची हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा धसका घेत वरिष्ठ संघाचा दौरा रद्द करण्यात आला होता. त्या वेळी असलेला धोका आजही कायम असल्याने विश्वचषकातून माघार घेत असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सुदरलँड यांनी स्पष्ट केले.

२७ जानेवारीपासून १९ वर्षांखालील विश्वचषकाला सुरुवात होत आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने माघार घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आर्यलडला स्पर्धेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार नसल्याने स्पर्धेचे मुख्य आकर्षणच हरवले आहे.

‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख सीन कॅरोल यांनी बांगलादेशचा दौरा केला. त्यांनी आयसीसीच्या सुरक्षा सल्लागारांची भेटही घेतली. दौऱ्याचा कार्यक्रम समजून घेतल्यानंतर तसेच परराष्ट्र मंत्रालय आणि बांगलादेशातील ऑस्ट्रेलियाच्या वकिलाती कार्यालयाशी चर्चा केल्यानंतर माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला’, असे सुदरलँड यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘खेळाडूंची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाला असलेला धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हा कटू निर्णय आहे’.

आर्यलडला संधी

ऑस्ट्रेलियाने माघार घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आर्यलडला स्पर्धेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आर्यलडच्या संघाला अन्य संघांप्रमाणेच सर्वोत्तम सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येईल असे आयसीसीने स्पष्ट केले. आर्यलडने सातवेळा विश्वचषकात प्रतिनिधित्त्व केले आहे.