मैदानावर संयम पाळावा व शाब्दिक मतभेद टाळावेत, असा सल्ला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी आपल्या संघातील खेळाडूंना दिला आहे.
एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर व भारताचा रोहित शर्मा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याबाबत लेहमन म्हणाले, अशा भांडणांमुळे खेळाडूंवर दंडात्मक कारवाई होते व आमच्या संघाच्या प्रतिष्ठेस या गोष्टी तडा देणाऱ्या आहेत. शक्यतो अशा घटना टाळण्याचा प्रयत्न आमच्या खेळाडूंनी केला पाहिजे. वॉर्नर हा आक्रमक खेळाबरोबरच आक्रमक स्वभावाचा आहे. मात्र अनेक वेळा या गोष्टी त्रासदायक असतात. मी त्याला खूप समजावून सांगितले आहे. तो पुन्हा असे गैरवर्तन करणार नाही.
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ मानला जातो. सामन्यांचे थेट प्रक्षेपण सगळीकडे पाहिले जात असते. त्यामुळे खेळाडूंनी त्याचे भान ठेवतच खेळले पाहिजे, वागले पाहिजे. आम्ही या स्पर्धेचे यजमान आहोत व ही प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे असाही सल्ला मी खेळाडूंना दिला असल्याचे लेहमन यांनी सांगितले.