ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव शनिवारी सकाळी ३८० धावांत आटोपला. पहिल्या दिवसापासून आपल्या फिरकीने कांगारुंना पॅव्हेलियनची वाट धरायला लावणाऱया आर. अश्विननेच नॅथन लिऑनला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची अखेर झाली. 
शुक्रवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात ३१६ धावा केल्या होत्या. अश्विननेच ८८ धावांच्या मोबदल्यात कांगारूंचे सहा मोहोरे टिपले होते. शनिवारी पीटर सिडल आणि पहिल्या दिवशी शतकी खेळी खेळणाऱया कर्णधार मायकल क्लार्कने मैदानावर जम बसविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कालच्या ३१६ धावांवरून ३६१ पर्यंत मजल मारली. त्याचवेळी रविंद्र जडेजाने क्लार्कला १३० धावांवर बाद केले. त्यानंतर लगेचच पीटर सिडल हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. लिऑन आणि जेम्स पॅटनसीन ही जोडी मैदानावर टिकून राहण्याच्या प्रयत्नात असतानाच पुन्हा अश्विनच भारतीय संघासाठी धावून आला आणि त्याने लिऑनला बाद केले.