दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिमाखदार मालिका विजयासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थान भारताकडून हिसकावले आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानी होता. मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे ११७ गुण असून ते अव्वल स्थानी आहेत. भारताचेही ११७ गुण असून गणितीय समीकरणांमुळे भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेत अव्वल स्थानी कब्जा करण्याची संधी आहे.
ऑस्ट्रेलियाचा निसटता विजय
सिडनी : विजयासाठी मिळालेल्या २७५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ३ बाद २१८ असा सुस्थितीत होता. मात्र त्यानंतर रॉबिन पीटरसनच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. जेम्स फॉल्कनरने संयमी खेळ करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. शेन वॉटसन (८२), आरोन फिंच (७६) तर स्टीव्हन स्मिथ (६७) या तिघांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला.
तत्पूर्वी क्विंटन डि कॉकच्या शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने २८० धावांची मजल मारली. त्याने १४ चौकारांसह १०७ धावा केल्या. फरहान बेहराडिनने ६३ तर रिले रोसूने ५१ धावा केल्या. पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोरचे लक्ष्य कमी करण्यात आले.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. क्विंटन डी कॉकला सामनावीर तर स्टीव्हन स्मिथला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.