स्पर्धेपूर्वी संभाव्य दावेदार म्हणून गणनाही न होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रत्येक सामन्यागणीक कामगिरीत सुधारणा करत पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर कब्जा केला. सोमवारी सकाळी ऑस्ट्रेलियाचा विजयी संघ मेलबर्न शहरातील फेडरेशन स्क्वेअर येथे पोहोचला. विश्वचषकासह आपल्या लाडक्या खेळाडूंबरोबर छायाचित्रे काढण्यासाठी, त्यांची स्वाक्षरी मिळवण्यासाठी हजारो चाहते जमले होते. मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखालील संघाचे परिसरात आगमन होताच जल्लोषाला उधाण आले. खेळाडूंच्या नावाचा जयघोष करण्यात आला.विश्वचषक पटकावल्यानंतरची भावना काय, असे विचारले असता क्लार्क म्हणाला, ‘‘रविवारी रात्री उशिरापर्यंत विजयाचा जल्लोष सुरू होता. आम्हाला जेमतेम झोप मिळाली आहे. चाहत्यांचे प्रेम आणि उत्साह आत्मविश्वास उंचावणारा आहे. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरल्याचे समाधान आहे.’’ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासह विश्वचषकाचा आनंद साजरा केला. मेलबर्नच्या मैदानावरील जल्लोष आटोपल्यानंतर संघाचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्येही खेळाडू, प्रशिक्षक आणि सहयोगींनी रविवारी रात्री उशिरापर्यंत विजय साजरा केला.प्रसारमाध्यमांकडून न्यूझीलंड संघाच्या कामगिरीचे कौतुकमेलबर्न क्रिकेट मैदानात नव्वद हजारांहून अधिक चाहत्यांच्या साक्षीने ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर कब्जा केला. जबरदस्त सांघिक कामगिरीसह कर्णधार मायकेल क्लार्कला त्याच्या सहकाऱ्यांनी शेवटच्या लढतीत अनोखी भेट दिली. क्रिकेटजगताचा मानबिंदू असणाऱ्या या यशासाठी ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी संघावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला आहे. ‘‘संपूर्ण स्पर्धेत आक्रमक कामगिरीसह छाप सोडणाऱ्या न्यूझीलंड संघाचे जेतेपदाचे स्वप्न थोडक्यात हुकले. मात्र देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी तुम्ही केली आहे,’’ अशा शब्दांत न्यूझीलंडमधील वृत्तपत्रांनी संघाचा हुरूप वाढवला आहे.ऑस्ट्रेलियासिडनी डेली टेलिग्राफविश्वविजेतेपदासह मायकेल क्लार्कचा परीकथेप्रमाणे एकदिवसीय क्रिकेटला अलविदा. दुखापतींच्या वेढय़ात अडकलेला क्लार्क विश्वचषकात खेळू शकेल का, याविषयी साशंकता होती. मात्र त्याने अथक मेहनतीच्या जोरावर हे शक्य करून दाखवले. संघातील प्रत्येक खेळाडूने विजयात योगदान दिले आहे. हेराल्ड सनविश्वचषकाचे सम्राट. पिवळ्या गणवेशातल्या पथकाने पुन्हा एकदा इतिहास घडवला. मेलबर्नच्या भव्य मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडला निष्प्रभ करत त्यांनी पाचवे ऐतिहासिक जेतेपद साकारले. दिमाखदार सांघिक प्रदर्शन हे या विश्वविजेतेपदाचे गुणवैशिष्टय़ आहे. कुरियर मेलआपल्या प्रदर्शनाने संघासमोर अनोखा आदर्श ठेवीत मायकेल क्लार्कच्या संघाने जेतेपदाची कमाई केली. मेलबर्नला चाहत्यांच्या जनसागरात क्लार्कच्या संघाने इतिहास घडवला. या जेतेपदासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय प्रकारातील आपली मक्तेदारी नव्याने सिद्ध केली.न्यूझीलंड न्यूझीलंड हेराल्डविश्वचषकाच्या अंतिम लढतीतला पराभव जिव्हारी लागणार असतो. तुम्ही या पराभवाने खचून जाणार नाही, अशी आशा आहे. कारण संपूर्ण स्पर्धेत आक्रमक पवित्र्यासह खेळताना तुम्ही अपराजित राहिला होतात. खेळभावनेची जोपासना करीत खेळातल्या तिन्ही आघाडय़ांवर तुम्ही वर्चस्व गाजवले होते. रविवारचा दिवस तुमचा नव्हता. तुमचा आम्हाला अभिमान आहे. द प्रेस संपूर्ण स्पर्धेतला तुमचा वावर अचंबित करणारा होता. प्रत्येक सामन्यात तुम्ही तडाखेबंद खेळ करीत अनोखा पायंडा प्रस्थापित केला आहे. तुमची कामगिरी न्यूझीलंड क्रिकेटला नव्या क्षितिजाकडे घेऊन जाणारी असेल. अंतिम लढतीत एका बलाढय़ संघासमोर तुमचा पराभव झाला. त्याने निराश होण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही लाखो चाहत्यांना जिंकले आहे. ओटागो डेली टाइम्सक्रिकेट जगतात विशेषत: एकदिवसीय प्रकारात मक्तेदारी असणाऱ्या बलाढय़ ऑस्ट्रेलियासमोर तुमचा पराभव झाला. त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. अंतिम लढतीचे दडपण कसे हाताळावे, हे तुम्ही लवकरच शिकाल. मात्र ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धेत तुम्ही खेळ केला आहे ते जगभरातल्या तुमच्या चाहत्यांना सुखावणारे आहे.