ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली. डकवर्थ लुईस नियमानूसार भारताने ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर २८२ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानूसार ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत १६४ धावांचे आव्हान देण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारता आली.

आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित केल्या. त्याने कुलदीप यादवच्या एका षटकात २२ धावांची लयलुट केली. मात्र फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ३९ धावा केल्या. यापूर्वी ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि हिल्टन कार्टराईट यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात केली. मात्र चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने हिल्टनला अवघ्या  १ धावेवर असताना क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार स्टीव्ह स्मिथला हार्दिक पांड्याने तंबूचा रस्ता दाखवला. बुमराहने त्याचा सुरेख झेल टिपला. आपल्या दुसऱ्या षटकात पांड्याने आणखी एक बळी मिळवला. त्याने ट्रॅव्हीस हेडला धोनीकरवी झेलबाद केलं. भारताच्या दोन मध्यमगती गोलंदाजांनी यश मिळवल्यानंतर फिरकीपटू कुलदीप यादवनेही एक बळी टिपला. त्याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला २५ धावांवर माघारी धाडत भारताला मजबूत स्थितीत आणले. या सामन्यात युजवेंद्र चहलने सर्वाधिक ३ बळी टिपले. तर कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ आणि बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १ बळी मिळवत त्याला उत्तम साथ दिली. अर्धशतकी खेळीनंतर २ बळी मिळवणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

चेन्नईत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली, मनीष पांडे हे फलंदाज झटपट बाद झाल्याने सलामीची फळी कोलमडली. केदार जाधवने रोहीत शर्माच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मोठी भागीदारी रचण्यात अपयश आलं. यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्याने सहाव्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. पांड्या माघारी परतल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत भारताला २८१ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजांना चांगलच सतावलं. नेथन कुल्टर-नाईल सर्वाधीक ३ बळी मिळवले, त्याला स्टॉयनीसने २ तर फॉल्कनर आणि झॅम्पाने १-१ बळी घेत चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ही भक्कम आहे. त्यामुळे या फलंदाजांना झटपट माघारी धाडण्यात भारताचे गोलंदाज यशस्वी ठरतात का हे पहावं लागणार आहे.

  • फिरकीपटू कुलदीप यादवने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केलं
  • ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात सलामीवीर  हिल्टन कार्टराईटनंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथही माघारी
  • पावसानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात डकवर्थ लुईस नियमानुसार, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष्य

 

छाया सौजन्य (बीसीसीआय ट्विटर)

  • हार्दिक पांड्या आणि धोनीच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर २८२ धावांचं आव्हान
  • अखेरच्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात धोनी ७९ धावांवर बाद, भारताला सातवा धक्का
  • सातव्या विकेटसाठी भुवनेश्वर कुमारसोबत ७२ धावांची धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी
  • अखरेच्या षटकांमध्ये महेंद्रसिंह धोनीची फटकेबाजी, अर्धशतक केलं साजरं
  • झॅम्पाच्या गोलंदाजीवर ८३ धावांवर असताना हार्दिक पांड्या बाद, भारताला सहावा धक्का
  • झॅम्पाच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याचा हल्लाबोल, सहाव्या विकेटसाठी धोनी-पांड्याची ११६ धावांची भागीदारी
  • अॅडम झॅम्पाच्या एका षटकात ३ षटकार ठोकत हार्दिक पांड्याचं अर्धशतक
  • धोनी आणि पांड्याची सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, भारताचा डाव सावरला
  • पाठोपाठ केदार जाधव स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर माघारी, भारताचा निम्मा संघ माघारी
  • मात्र स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर आखुड टप्प्याचा चेंडु खेळताना रोहीत शर्मा माघारी, भारताला चौथा धक्का
  • केदार जाधवची आक्रमक फटकेबाजी, रोहीत शर्माचीही उत्तम साथ
  • रोहीत शर्मा – केदार जाधव जोडीने भारताचा डाव सावरला, दोघांमध्ये ५३ धावांची अर्धशतकी भागीदारी
  • सलामीच्या ३ फलंदाजांना माघारी धाडण्यात ऑस्ट्रेलियाला यश
  • पाठोपाठ कुल्टर-नाईलने मनीष पांडेलाही धाडलं माघारी, भारताला तिसरा धक्का
  • कर्णधार विराट कोहली कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता माघारी
  • ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या आक्रमणासमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी
  • अजिंक्य रहाणेला माघारी धाडण्यात कांगारुंच्या गोलंदाजांना यश, कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर रहाणे बाद
  • रहाणे-रोहीत शर्माकडून भारताच्या डावाची सावध सुरुवात
  • अजिंक्य रहाणेला संघात जागा, भारतीय डावाची करणार सुरुवात
  • भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय