गुवाहटी टी-२० सामन्यात भारताच्या फलंदाजीला वेसण घालत ऑस्ट्रेलियाने सामना आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाच्या जलदगती आक्रमणासमोर भारताचा डाव अवघ्या ११८ धावांमध्ये आटोपला. केदार जाधव आणि हार्दिक पांड्याचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला नाही. जेसन बेहरनडॉर्फने सामन्यात ४ बळी घेत भारताची सलामीची फळी कापून काढली.

ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना झटपट माघारी धाडत भारतीय गोलंदाजांनी सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मॉईजेस हेन्रिकेज आणि ट्रेविस हेड या जोडीने शतकी भागीदारी करत सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चीत केला. मात्र या सामन्यात पराभव पत्करावा लागूनही भारताच्या विराट कोहलीने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. याव्यतिरीक्त सामन्यात तब्बल ११ विक्रमांची नोंद करण्यात आली.

४७ – टी-२० सामन्यात शून्यावर बाद होण्याआधी सर्वाधीक इनिंग खेळण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर. तब्बल ४७ सामन्यांनंतर विराट कोहली पहिल्यांदा टी-२० सामन्यात शून्यावर बाद झाला.

१ – भारताला भारतात टी-२० सामन्यात हरवण्याची ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच वेळ.

२ – पॉवरप्लेमध्ये ४ बळी गमावण्याची भारताची ही दुसरी वेळ ठरली. याआधी २००८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या टी-२० सामन्यात भारताने पॉवरप्लेमध्ये ४ बळी गमावले होते.

३ – टी-२० क्रिकेटमध्ये १०० झेल घेणारा विराट कोहली तिसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी हा विक्रम साधला आहे.

४ – जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीचं ४-०-२१-४ हे पृथ्थकरण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचं टी-२० क्रिकेटमध्ये भारतातलं सर्वोत्तम मानलं जात आहे. याआधी नॅथन ब्रेकनने २००८ साली ११ धावांमध्ये ३ बळी घेतले होते.

५ – आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीचीत होण्याची महेंद्रसिंह धोनीची ही पाचवी वेळ. याआधी २०११ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशुच्या गोलंदाजीवर धोनी यष्टीचीत झाला होता.

७ – संपूर्ण संघ बाद होण्याची भारतीय संघाची ही सातवी वेळ ठरली. याआधी सहाही सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे.

७ – ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग ७ टी-२० सामने जिंकण्याची मालिका भारताच्या गुवाहटीतल्या पराभवाने खंडित झाली.

१६ – भारताच्या पहिल्या ४ फलंदाजांनी मिळून सामन्यात अवघ्या १६ धावा काढल्या. याआधी २००८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी अशीच निराशाजनक कामगिरी केली.

४९ – गुवाहटीचं एसीए बारसपारा मैदान हे आंतराष्ट्रीय सामना खेळवणारं भारतातलं ४९ वं मैदान ठरलं.

१०९ – हेन्रिकेज आणि ट्रेविस हेड यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली १०९ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियाची भारतातील टी-२० क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी मानली जातेय.