सलामीवीर रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेली शतकी भागीदारी आणि मधल्या फळीत हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात कांगारुंवर ५ गडी राखून मात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने ३-० अशी आघाडी घेतली. या विजयामुळे भारत आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना अॅरोन फिंचच्या शतकी खेळीच्या आधारावर २९३ धावांची मजल मारली. कुलदीप यादवने मधल्या फळीला धक्के दिल्यामुळे कांगारुंना ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

इंदूरच्या मैदानात काल ‘या’ १२ विक्रमांची नोंद करण्यात आली –

१ – ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधीक षटकार मारण्याचा विक्रम आता रोहित शर्माच्या नावावर. याआधी न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्यूलमच्या नावे हा विक्रम होता. मॅक्यूलमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६१ षटकार ठोकले आहेत. कालच्या खेळीत रोहीतने मॅक्यूलमचा हा विक्रम मोडीत काढत पहिलं स्थान पटकावलं आहे. रोहितच्या नावावर कांगारुंविरुद्ध ६५ षटकार आहेत.

२ – भारताविरुद्ध ३ डावांमध्ये शतकी भागीदारी करणारी स्टिव्ह स्मिथ आणि अॅरोन फिंच ही ऑस्ट्रेलियाची दुसरी जोडी ठरली आहे. याआधी २००३ साली अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडनने ही कामगिरी केली होती.

३ – सलग ६ वन-डे मालिका जिंकण्याची भारतीय संघाची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा राहुल द्रवीड, त्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ही किमया साधली आहे.

४ – भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग ४ वन-डे सामने जिंकले आहेत. आगामी बंगळुरु येथे होणारा वन-डे सामना भारताने जिंकला तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग ५ सामने जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरेल.

६ – भारताचा हा सलग सहावा मालिका विजय ठरला आहे.

६ – इंदूरच्या मैदानावर खेळवण्यात आलेले सहाही सामने आतापर्यंत भारताने जिंकले आहेत.

८ – अॅरोन फिंचच्या नावे वन-डे सामन्यात ८ शतक जमा आहेत. कसोटीत एकही शतक न झळकावता वन-डेत शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत फिंचच्या पुढे विल्यम पोर्टफिल्ड (९ शतक) हा खेळाडू आहे.

९ – हा भारताचा वन-डे सामन्यांमधला सलग नववा विजय ठरला आहे. या विजयासह भारताने आपल्याच सलग वन-डे सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. याआधी १४ नोव्हेंबर २००८ ते ५ फेब्रुवारी २००९ या कालावधीत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी केली होती.

११ – बाहेरच्या मैदानावर खेळताना ऑस्ट्रेलियाचा वन-डे सामन्यांमधला हा अकरावा पराभव ठरला.

३८ – कर्णधार या नात्याने सर्वात जलद ३० विजय मिळवणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली हा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटींगने ३७ सामन्यांमध्ये हा विक्रम केलाय. कोहलीने यासाठी ३८ सामने घेतले.

४२ – ४२ चेंडूंमध्ये झळकावलेलं अर्धशतक हे रोहित शर्माचं सर्वात जलद अर्धशतक ठरलंय. याआधी मागच्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ४३ चेंडुंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.

७५० – आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५० बळी मिळवणारा महेंद्रसिंह धोनी हा तिसरा यष्टीरक्षक ठरलाय. याआधी ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर यांनी हा विक्रम केला आहे.