डेव्हिड वॉर्नरच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश साकारले.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मालिकेत भन्नाट सूर गवसलेल्या वॉर्नरने सहकारी नियमित अंतरात बाद होत असतानाही एकेरी, दुहेरी धावांबरोबरच चौकारांची लूट केली. अन्य फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी धडपडत असताना वॉर्नरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत खेळ केला. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर चौकार खेचत वॉर्नरने एकदिवसीय प्रकारातील अकराव्या तर यंदाच्या कॅलेंडर वर्षांतील सातव्या शतकाची नोंद केली. एका कॅलेंडर वर्षांत एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची वॉर्नरने बरोबरी केली. मात्र यंदाच्या वर्षांतला ऑस्ट्रेलियाचा हा शेवटचा एकदिवसीय सामना असल्याने वॉर्नरला तेंडुलकरचा विक्रम मोडता येणार नाही. सलामीला येत संपूर्ण डाव खेळून काढण्याचा विक्रम नावावर करण्याची वॉर्नरला संधी होती. मात्र डावातील शेवटच्या चेंडूवर वॉर्नर धावचीत झाला. त्याने १३ चौकार आणि ४ षटकारांसह १५६ धावांची मॅरेथॉन खेळी केली. वॉर्नरचा दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला २६४ धावांचीच मजल मारता आली. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्टने ३ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जराही प्रतिकार न करता सातत्याने विकेट्स गमावल्या आणि त्यांचा डाव १४७ धावांतच संपुष्टात आला. मार्टिन गप्तीलने सर्वाधिक ३४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ बळी घेतले. या मालिकेत २९९ धावा करणाऱ्या वॉर्नरला सामनावीर तसेच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ८ बाद २६४ (डेव्हिड वॉर्नर १५६; ट्रेंट बोल्ट ३/४९) विजयी विरुद्ध न्यूझीलंड : ३६.१ षटकांत सर्वबाद १४७ (मार्टिन गप्तील ३४; मिचेल स्टार्क ३/३४)
  • सामनावीर आणि मालिकावीर : डेव्हिड वॉर्नर</li>