डेव्हिड वॉर्नरचे शतक; दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडवर ११६ धावांनी मात

डेव्हिड वॉर्नरने हंगामातील सहावे शतक झळकावताना ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर ११६ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या चॅपल-हॅडली चषक मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विजयासाठी ३७८ धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडचा डाव ४७.२ षटकांत २६२ धावांवर गडगडला. वॉर्नरने ११५ चेंडूंत ११९ धावांची दमदार खेळी केली.

वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी अर्धशतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, मिचेल सँटनरने फिंचला त्रिफळाचीत करून ही जोडी फोडली. त्यानंतर स्टीव्हन स्मिथसह वॉर्नरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. वॉर्नरने १४ चौकार व १ षटकार खेचून ११९ धावा केल्या. त्याला कर्णधार स्मिथने ७६ चेंडूंत ७२ धावा आणि ट्रॅव्हीस हेडने ३२ चेंडूंत ५७ धावा करून चांगली साथ दिली. मिचेल मार्शने अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडताना ४० चेंडूंत ७६ धावा कुटल्या आणि संघाला निर्धारित ५० षटकांत ३७८ धावांचा डोंगर उभा करून दिला.

न्यूझीलंडच्या जिम्मी निशाम आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी तिसऱ्या विकेट्साठी १२५ धावांची भागीदारी करून २ बाद ५२ या अवस्थेत असलेल्या संघाला तारले. ३१व्या षटकात जोश हॅझलवूडने निशामला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली आणि न्यूझीलंडच्या डावाला सुरुंग लागला. त्यांचा संपूर्ण संघ २६२ धावांत तंबूत परतला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ५ बाद ३७८ (डेव्हिड वॉर्नर ११९, स्टिव्हन स्मिथ ७२, ट्रॅव्हीस हेड ५७, मिचेल मार्श नाबाद ७६; टीम साऊदी २-६३) विजयी वि. न्यूझीलंड : ४७.२ षटकांत २६२ (मार्टिन गप्तिल ४५, केन विल्यमसन ८१, जेम्स निशाम ७४; पॅट कमिन्स ४-४१)