१३१ धावांची आवश्यकता; पॅटिन्सन आणि बर्डचा प्रभावी मारा
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठय़ावर उभा आहे. २०१ धावांचा पाठलाग करताना जो बर्न्‍स आणि उस्मान ख्वाजा यांनी संयमी खेळी करून ऑस्ट्रेलियाला दिवसअखेर १ बाद ७० धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. या कसोटीत विजय मिळवल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर पुन्हा विराजमान होणार आहे.
जेम्स पॅटिन्सन आणि जॅक्सन बर्ड यांच्या प्रभावी माऱ्यापुढे न्यूझीलंडचा दुसरा डाव ३३५ धावांवर गडगडला. ४ बाद १२१ धावांवरून खेळाची सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडला कोरे अ‍ॅण्डरसन आणि केन विल्यमसन यांनी आश्वासक मार्ग दाखवला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ही जोडी धावांचा डोंगर उभा करेल असे वाटत असताना बर्डने अ‍ॅण्डसरनचा त्रिफळा उडवला. त्याने १४८ चेंडूंत ५ चौकार लगावून ४० धावा केल्या. त्यापाठोपाठ २१० चेंडूंत ८ चौकारांसह ९७ धावांची खेळी करणाऱ्या विल्यमसनला बर्डनेच त्रिफळाचीत केले. टीम साऊदीलाही भोपाळा फोडू न देता बर्डने माघारी पाठवले. न्यूझीलंडचा डाव पाहता-पाहता कोसळला, परंतु बी. वॉटलिंग आणि मॅट हेन्री यांनी संघाला आधार देण्याचा प्रयत्न केला. आठव्या विकेटसाठी दोघांनी ११८ धावांची भागीदारी केली. वैयक्तिक ४६ धावांवर खेळणाऱ्या वॉटलिंगला पॅटिन्सनने बाद केले. बर्डने पुन्हा एकदा अचूक मारा करून हेन्रीचा त्रिफळा उडवला. हेन्रीने ९३ चेंडूंत १२ चौकार लगावून ६६ धावा केल्या. ट्रेंट बोल्टला शून्यावर माघारी पाठवून बर्डने न्यूझीलंडचा दुसरा डाव ३३५ धावांवर संपुष्टात आणला. पॅटिन्सनने ४, तर बर्डने ५ बळी घेतले.
विजयासाठी २०१ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर १ बाद ७० धावांपर्यंत मजल मारली आहे.

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) : ३७०; ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५०५
न्यूझीलंड (दुसरा डाव) : ३३५ (टॉम लॅथम ३९, केन विलियम्सन ९७, कोरे अ‍ॅण्डरसन ४०, बी. वॉटलिंग ४६, मॅट हेन्री ६६; जेम्स पॅटिन्सन ४/७७, जॅक्सन बर्ड ५/५९)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : १ बाद ७० (जो बर्न्‍स खेळत आहे २७, डेव्हिर्ड वॉर्नर २२, उस्मान ख्वाजा खेळत आहे १९; नील वेंगर १/१३).

टीम साऊदीला भोपाळा ही फोडू न देता बर्डने माघारी पाठवले.