शूटआऊटमध्ये भारतावर ऑस्ट्रेलियाचा विजय
जागतिक हॉकी लीग अंतिम स्पध्रेच्या तयारीसाठी खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने आघाडीपटू आकाशदीप सिंगच्या निर्णायक गोलच्या जोरावर ३-२ असा विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे मालिकेचा निकाल लावण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलियाने ३-२ असा विजय मिळवत मालिका २-० अशी खिशात घातली.

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला यजमानांनी कडवा संघर्ष दिला. पहिल्या सामन्यात पिछाडीवरून मुसंडी मारताना भारताने २-२ अशी बरोबरी साधली. मात्र दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अव्वल दर्जाचा खेळ करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारताकडून दमदार खेळाची अपेक्षा होतीच. पहिले सत्र गोलशून्य गेल्यानंतर व्ही. आर. रघुनाथने १७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताचे खाते उघडले. मात्र, ३६व्या मिनिटाला ट्रेंट मिट्टॉनने गोल करून भारताला प्रत्युत्तर दिले. पाच मिनिटांच्या आत रुपिंदर पाल सिंगने गोल करत पुन्हा भारताला २-१ असे आघाडीवर आणले.

सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भारताने मजबूत पकड घेतली होती, परंतु ५३व्या मिनिटाला मिट्टॉनच्या गोलने सामन्यात चुरस निर्माण केली. सामना २-२ असा बरोबरीत सुटेल असे वाटत असताना आकाशदीपने ६०व्या मिनिटाला गोल करत भारताचा ३-२ असा विजय निश्चित केला. आकाशदीपच्या या गोलने भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. मालिकेच्या निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला आणि त्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.