विजय मिळवणे सोपे नसते, तर विश्वविजय मिळवणे त्याहूनही कठीण. पण जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात विश्वचषक खेळायला दाखल झाला तेव्हा हे विजेतेपद पटकावतील, असे त्यांच्याकडे पाहून वाटते होते, त्यांच्या चेहऱ्यावर ते लिहिलेले नव्हते, पण ज्या पद्धतीने त्यांची देहबोली होती ती जग जिंकायचीच होती. कोणाच्याही नजेरला त्या नजर देऊ शकत होत्या, कारण त्यांचा स्वत:वर विश्वास होता. महिला विश्वचषकातील आठही संघांमध्ये गुणवत्ता होतीच, पण अनुभव, जिंकण्याची सवय आणि ईर्षां ही ऑस्ट्रेलियाच्या संघात ओतप्रोत भरलेली होती. जिद्द, चिकाटी, मेहनतीबरोबरच त्यांच्याकडे रणनीती होती आणि त्यामुळेच त्यांना सहाव्यांदा विश्वचषकाला गवसणी घालता आली. ऑस्ट्रेलियाने तर लौकिकाला साजेसा खेळ केलाच, पण त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी क्रिकेट-विश्वाला आपली दखल घ्यायला लावली.ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाचे मनोबल नक्कीच दुणावलेले होते, पण कुठेही ते गाफील दिसले नाहीत. त्यांची कर्णधार जॉडी फिल्ड्स प्रत्येक वेळी म्हणायची ‘जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, तोपर्यंत विजय मिळाल्याचे आम्ही गृहीत धरत नाही,’ यावरूनच त्यांच्याकडे असलेला संयम कळून येतो. ऑस्ट्रेलियन्स हे आक्रमक असतात तसे ते होतेही, पण संयम आणि संयतपणा त्यांच्याकडे होता. इलिस पेरी हे त्यांचे ‘ट्रम्प कार्ड’ होते. त्यांनी तिला अंतिम फेरीसाठी राखून ठेवले आणि तिनेही चोख कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलियाला जिंकण्याची सवय असली तरी भविष्याचा विचार करून जिंकता जिंकता हरण्याचीही कला त्यांच्याकडे आहे. ‘सुपर-सिक्स’मध्ये वेस्ट इंडिजकडून जिंकता जिंकता पराभव पत्करून त्यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना स्पर्धेतून बाहेर फेकले, तर अंतिम फेरीत वेस्ट इंडिजवर तब्बल ११४ धावांनी विजय मिळवत आपली चाल यशस्वी करून दाखवली. त्यांना वेस्ट इंडिजपेक्षा इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याकडून धोका होता, त्यांनी तो हेरला, त्या पद्धतीने रणनीती आखली आणि यशस्वीपणे राबवलीही.ऑस्ट्रेलियाला स्पर्धेत चांगली सुरुवात मिळाली नसली तरी त्यांची सलामीवीर मेग लॅनिंगने स्पर्धेत २२६ धावा केल्या, तर जेस कॅमेरूनने २२५ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये मेगान शटने स्पर्धेत सर्वाधिक १५ विकेट्स मिळवल्या. अंतिम फेरीत अनुभवी पेरीने तीन आणि लिसा स्थळेकर व शट यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. कुठे, कशी कामगिरी करायची हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. क्षेत्ररक्षणात तर त्यांनी प्रत्येक सामन्यात साधारणत: १५-२० धावा सहज वाचवल्या. एकंदरीत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजयाच्या लायक होताच, त्यामुळे कोणालाही या विजेतेपदाबद्दल नवल वाटले नाही.वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी या विश्वचषकात आपली छाप पाडली. श्रीलंकेच्या संघाने तर गतविजेत्या इंग्लंडला धक्का दिला, त्याचबरोबर भारतालाही पराभूत केले. तर वेस्ट इंडिजने याच श्रीलंकेला २०९ धावांनी धूळ चारली. ऑस्ट्रेलियालाही त्यांनी पराभूत केले. वेस्ट इंडिजकडून डीएन्ड्रा डॉटिन आणि श्रीलंकेकडून ईशा कौशल्या यांनी आपली छाप पाडली. वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरने श्रीलंकेविरुद्ध १७१ धावांची तडाखेबंद खेळी साकारली.ही स्पर्धा विश्वचषकासारखीच दर्जेदाररीत्या पार पडली. सर्व संघांनी आपले सर्वस्व पणाला लावत लौकिकाला साजेशी कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, काहींना यश लाभले तर काही संघांना अपयश. विश्वचषक चांगलाच रंगला असला तरी क्रिकेटवेडय़ा भारतात या स्पर्धेला प्रेक्षकांची वानवा होती.अगदी सुट्टीच्या दिवशीही दर्दी मुंबईकर या सामन्यांकडे फिरकलेच नाहीत.भारतात क्रिकेट धर्म समजला जात असला तरी या धर्मामध्ये भेद असल्याचे प्रकर्षांने जाणवले. बऱ्याच कर्णधारांना हे बोचले आणि त्यांनी ते व्यक्तही केले. पण त्यांच्या बोलण्यात एक सकारात्मकता होती. एक आशा, उमेद होती. ‘आज आमच्या सामन्यांना प्रेक्षक फार कमी येतात, पण हे दिवस नक्कीच बदलतील,’  असाच साऱ्या क्रिकेटपटूंचा सूर होता.  ऑस्ट्रेलियाने विश्वचषक पटकावला खरा, पण महिला क्रिकेटचा विजय कधी होणार, त्यांना पुरुषांप्रमाणे स्थान, प्रसिद्धी, ग्लॅमर कधी मिळणार, हे काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. हे प्रश्न संपतील तेव्हा महिला क्रिकेट सर्वोच्च उंचीवर असेल.
महिला क्रमवारीत मिताली अव्वल
दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने विश्वविजयासह अव्वल क्रमांक पटकावला आहे, तर विश्वचषकात उपविजेत्या ठरलेल्या वेस्ट इंडिजने दुसरे स्थान पटकावले आहे. भारताला या वेळी सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
पुरुषांपेक्षा जास्त विश्वचषक जिंकल्याचा आनंद  -जॉडी फील्ड्स
मुंबई : पुरुषांपेक्षा जास्त विश्वचषक जिंकल्याचा आनंद आहेच, पण या स्पर्धेसाठी त्यांचा आम्हाला चांगलाच पाठिंबा मिळाला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. या विश्वविजेता संघाबरोबरच दोनदा विश्वविजयी संघात राहिल्याचा आनंद काही वेगळाच आहे. ‘सुपर-सिक्स’मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना गमावल्याने आम्ही निराश झालो होतो, पण अंतिम सामन्यात आम्ही लौकिकाला साजेसा खेळ केला. गेल्या वर्षी भारतात आम्ही खेळायला आलो होतो, त्याचा आम्हाला चांगलाच फायदा झाला.