इंडोनेशियन सुपरसीरिजजिंकणारा किदम्बी श्रीकांत व गतविजेती सायना नेहवाल यांच्याकडून भारताला ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत मोठय़ा कामगिरीची अपेक्षा आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीच्या लढतींना मंगळवारपासून सुरुवात होणार आहे.

श्रीकांत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सिंगापूर खुल्या स्पर्धेत त्याने उपविजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याने इंडोनेशियन स्पर्धेमध्ये अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. येथे त्याला बुधवारी पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या खेळाडूशी खेळावे लागणार आहे.

भारताच्या एच. एस. प्रणॉयने इंडोनेशियन स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता चेन लोंग व रौप्यपदक विजेता ली चोंग वेई यांच्यावर मात करत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र उपांत्य फेरीत त्याला जपानच्या काझुमासा सकाईने पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियन स्पर्धेतही अनपेक्षित निकाल नोंदविण्यासाठी प्रणॉय उत्सुक आहे.

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना व रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू यांना येथे  चिवट लढत द्यावी लागणार आहे. पहिल्या फेरीत सायनाची दक्षिण कोरियाच्या सुंगजेई हियुनशी गाठ पडणार आहे. सिंधूपुढे जपानच्या सायको सातोचे आव्हान असणार आहे.

सिंगापूर सुपरसीरिजमध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या बी.साईप्रणीतकडून येथे सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला पहिल्या लढतीत इंडोनेशियाच्या टोमी सुगिआतरेशी झुंज द्यावी लागणार आहे. समीर वर्माचा चीन तैपेईच्या तुझवेई वांग याच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.