भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. पण ही मालिका दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये झालेल्या शाब्दीक युद्धामुळे चांगलीच चर्चेचा विषय ठरली. या मालिकेदरम्यान अनेक कटू अनुभव समोर आले. भर मैदानात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबत खटले उडाले असले तरी मैदानाबाहेर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये चांगले संबंध असल्याचे सांगण्यात आले. पण आता त्यालाही पूर्णविराम मिळाला आहे. कारण खुद्द कर्णधार विराट कोहलीने याने ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आता मित्र राहिले नाहीत, असं स्पष्ट जाहीर केलं आहे.

बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघ अजूनही तुझे मित्र आहेत का? असे कोहलीला विचारण्यात आले. यावर कोहलीने स्पष्ट नकार देऊन आता सगळी परिस्थिती बदलली असल्याचे सांगितले.

कोहली म्हणाला की, ”नाही, आता पहिल्यासारखी स्थिती राहिलेली नाही. मी आधी असाच विचार करायचो, पण आता सगळं बदललं आहे. खेळाच्या मैदानात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणूनच खेळायचं असतं, पण मी चुकीचा ठरलो. पहिल्या कसोटीनंतर मी जे म्हटलं होतं, त्याबाबत मी चुकीचा सिद्ध झालो. ते आता मित्र राहिलेले नाहीत.”

कोहलीच्या या विधानामुळे दोन्ही संघांमध्ये कमालीची दुफळी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रांची कसोटीत कोहली आणि स्मिथ यांच्यात भर मैदानात खटके उडाले होते. त्यानंतर कोहलीला दुखापत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी उडवलेल्या खिल्लीनेही कोहली दुखावला होता. धरमशाला कसोटीतही मॅथ्यू वेडने जडेजाला फलंदाजीवेळी डिवचण्याचाचा प्रयत्न केला. तर स्मिथने ड्रेसिंगरूममधून मुरली विजयला अपशब्द बोललल्याचे कॅमेरात कैद झाले होते.

संपूर्ण मालिकेत मी प्रतिस्पर्धी संघाचा सर्वात मोठा शत्रू होतो. त्यांनी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने निशाणाही साधला. मालिकेत माझी कामगिरी फारशी चांगली नव्हती. आता टीकाकारांना माझ्याविरोधात बोलण्याची पूर्ण संधी मिळाली असेल. पण मला यामुळे काहीही फरक पडत नाही, असेही कोहली म्हणाला. याशिवाय विराट कोहलीने ऑस्ट्रेलियातील माध्यमांवरही शरसंधान साधले. “घरात बसून ब्लॉग लिहिणं किंवा माईकवर बोलणं सोपं असतं. पण मैदानात येऊन सामना करणं अतिशय कठीण असतं,” असे कोहली म्हणाला.

ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी कोहलीची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली होती. कोहली क्रीडा जगतातील डोनाल्ड ट्रम्प असल्याचे डेली टेलिग्राफने छापले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन माध्यमांवर टीकाही केली होती. टीम इंडियातील खेळाडूंनीही ऑस्ट्रेलियन माध्यमांची कृती दुर्देवी असल्याचे म्हटले होते.