गेले काही आठवडे भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी कायम आठवणीत राहतील असे जात आहेत. सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, साई प्रणीत, एच.एस.प्रणॉय यांनी आपापल्या कामगिरीत सुधारणा केलीच आहे. मात्र किदम्बी श्रीकांतने लागोपाठ इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावून आपण चांगल्या फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं.

आज सकाळी चीनच्या चेन लाँगवर श्रीकांतने सरळ दोन सेट्समध्ये २२-२०, २१-१६ अशी मात केली. यानंतर ट्वीटरवर श्रीकांतवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. मात्र क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने दिलेल्या शुभेच्छा श्रीकांतचं आगामी स्पर्धांसाठी बळ वाढवणाऱ्या ठरल्या.
श्रीकांतचा सामना झाल्यानंतर सचिनने ट्विट करुन, मला तुझा अभिमान वाटतो! असं ट्विट केलं.

याला उत्तर देताना श्रीकांतने सचिनचे आभार मानत, देशासाठी यापुढेही सर्वोत्तम खेळ करत राहण्याचं वचन दिलं.

किदम्बी श्रीकांत हा सचिन तेंडुलकरचा निस्सीम चाहता आहे. २०१५ सालच्या वर्ल्ड चॅम्पियनशीप दरम्यान दोघांचीही पहिल्यांदा भेट झाली होती. यावेळी आपण सचिनशी फार काही बोलू शकलो नाही. मात्र ५ ते ७ मिनीटांच्या संभाषणात सचिनने श्रीकांतला, तू लवकरच वर्ल्ड नंबर १ बनशील अशा शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छा आपल्याला चांगला खेळ करायला प्रोत्साहीत करतात असं श्रीकांत आजही आवर्जून नमूद करतो.

आजच्या विजयानंतर श्रीकांतच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. सलग ३ सुपर सिरीज स्पर्धांची अंतिम फेरी खेळणारा श्रीकांत हा जगातला ६ वा आणि भारताचा पहिलाच खेळाडू बनला आहे. इंडोनेशिया आणि सिडनी ओपनच्या आधी सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत श्रीकांतला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.सचिन सोबत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि श्रीकांतचा सहकारी एच.एस.प्रणॉयने ट्विट करुन श्रीकांतला शुभेच्छा दिल्या आहेत.