ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूने आपला धडाका कायम ठेवला आहे. दुसऱ्या फेरीत सिंधूने आपली चीनी प्रतिस्पर्धी चेन शिओशिनवर २१-१३, २१-१८ अशा सरळ २ सेट्समध्ये मात केली आहे. जागतिक क्रमवारीत सिंधूची प्रतिस्पर्धी ही २२ व्या स्थानावर आहे. त्यामुळे सिंधूसाठी हा सामना तुलनेने सोपा मानला जात होता.

प्रत्यक्ष सामन्यातही सिंधूने आपला फॉर्म कायम ठेवला. सुरुवातीच्या सेटमध्ये सिंधूकडे ६-३ अशी आघाडी होती. मात्र त्यानंतर काही काळ चेनने ही आघाडी कमी केली होती. यानंतर सिंधूने सामन्यात परत कमबॅक करत १३-९ अशी आघाडी घेतली. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये काही चांगल्या रॅली पहायला मिळाल्या. चेनने सिंधूला पहिल्या सेटमध्ये अनेक वेळा चुका करायला भाग पाडलं, मात्र सिंधूने तिला दाद लागू दिली नाही. पहिल्या सेटमध्ये ७ गेम पॉईंट जिंकत अखेर सिंधूने पहिला सेट आपल्या खिशात घातला.

दुसरा सेटही सिंधू सहज जिंकेल असं वाटत असताना सुरुवातीलाच चेनने तिला धक्का दिला. २-२ अशा बरोबरीतून चेनने ५-२ अशी आघाडी घेतली. मात्र सिंधूने चेनला सामन्यात परत डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. अवघ्या काही मिनीटातच सिंधूने सामन्यात ११-११ अशी बरोबरी साधली. मात्र चेनने या सेटमध्ये सिंधूला चांगलंच झुंजवलं. प्रत्येक वेळा आघाडी घेऊन सामना जिंकू पाहणाऱ्या सिंधूला चेनच्या झुंजार खेळामुळे एक पाऊल मागे यावं लागत होतं.
मात्र १७-१८ अशा नाममात्र आघाडीवरुन सिंधूने आपला सगळा अनुभव पणाला लावत दुसऱ्या सेटसह सामनाही आपल्या खिशात घातला. त्यामुळे सिंधूच्या विजयानंतर आता सायनासमोर आपली दुसरी फेरी जिंकून पुढे जाण्याचं आव्हान असणार आहे.