भारतीय महिलांपाठोपाठ पुरुष खेळाडूंनीही ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपली घोडदौड कायम ठेवली आहे. बी. साई प्रणीत आणि किदम्बी श्रीकांत यांनी आपल्या दुसऱ्या फेरीचे सामने जिंकले आहेत. जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर असलेल्या साई प्रणीतने आपल्या चीनी प्रतिस्पर्ध्यावर २१-१५, १८-२१, २१-१३ अशी मात केली. श्रीकांतनेही आपला इंडोनेशियन ओपनमधला फॉर्म कायम ठेवत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या सन वॅन हू वर १५-२१, २१-१३, २१-१३ असा विजय मिळवला.

दोन्ही खेळाडूंनी आपल्या सामन्याची सुरुवात मोठ्या धमाकेदार पद्धतीने केली. साई प्रणीतला आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाहीत, मात्र श्रीकांतला सन वॅन हू ने चांगलीच टक्कर दिली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र श्रीकांतने वॅन हू कडून आघाडी खेचून घेत १६-१० अशी आघाडी घेतली, आणि दुसरा सेटही आपल्या खात्यात टाकला.

निर्णायक सेटमध्येही श्रीकांतने वॅन हूला धक्का देत सुरुवातीपासून आघाडी आपल्याकडे कायम ठेवली. तिसऱ्या सेटमध्ये श्रीकांतच्या फटक्यांना उत्तर देणं वॅन हू ला जवळपास अशक्यप्राय दिसत होतं. एका क्षणापर्यंत श्रीकांतकडे ९ गुणांची आघाडी होती. सन वॅन हू ला पराभूत करण्याची श्रीकांतची ही दुसरी वेळ आहे. गेल्याच आठवड्यात इंडोनेशियन ओपनच्या उपांत्य सामन्यात श्रीकांतने वॅन हू चा पराभव केला होता.

श्रीकांतप्रमाणे प्रणीतनेही निर्णायक सेटमध्ये पहिल्या पॉईंटपासून आपल्याकडे आघाडी कायम ठेवली. आपल्या चीनी प्रतिस्पर्ध्याविरोधात साई प्रणीतने ११-६ अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या अखेर साई प्रणीतने प्रतिस्पर्ध्याला फारशी संधी न देता अखेरचा सेट २१-१३ अशा फरकाने जिंकला.
सध्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत एकेरीच्या सामन्यांमध्ये भारताच्या सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, तर दुहेरीमध्ये अश्विनी पुनप्पा, सिकी रेड्डी तर पुरुषांच्या दुहेरीमध्ये सत्विकसाईराज रेड्डी, चिराग शेट्टी यांचं आव्हान शिल्लक आहे.