आशियाई देशांमधील चाहत्यांमध्ये वाढ व्हावी, या हेतूने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी जानेवारीत या स्पर्धेनेच ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मोसमास सुरुवात होत असते.
‘‘स्पर्धेतील पुरुष व महिलांच्या एकेरीतील विजेत्या खेळाडूला प्रत्येकी तीन दशलक्ष डॉलर्सची कमाई होणार आहे,’’ असे टेनिस ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रेग टिली यांनी सांगितले. स्पर्धेच्या स्टेडियमचे नूतनीकरण झाले असून त्याचे उद्घाटन टिली यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, ‘‘स्पर्धेचा दर्जा अधिक उंचावण्याच्या हेतूने पारितोषिक रक्कम, अन्य सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. खेळाडूंबरोबरच प्रेक्षकांच्या सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे.’’
स्पर्धेचे संचालक रिचर्ड हॅसेलग्रेव्ह म्हणाले, ‘‘गॅलरीत अनेक ठिकाणी त्रिस्तरीय आच्छादने घालण्यात आली आहेत. आशियाई खंडातील प्रेक्षकांची संख्या वाढावी या हेतूने आम्ही प्रेक्षकांकरिता अनेक योजना अमलात आणणार आहोत. शांघाय व शेनझान येथील प्रेक्षक मोठय़ा संख्येने आमच्याकडे येत असतात. त्यांच्याकरिता सवलतीची योजना अमलात आणली जाणार आहे.’’