सेरेना, जोकोव्हिच, त्सोंगा चौथ्या फेरीत

रशियाच्या मारिया शारापोव्हाने आपल्या कारकीर्दीतील सहाशेव्या विजयाची नोंद केली. याचप्रमाणे नोव्हाक जोकोव्हिच आणि ‘सुपर सेरेना’ असे बिरुद मिरवणाऱ्या सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेतील विजयी घोडदौड कायम राखताना चौथी फेरी गाठली आहे. सेरेनाने फक्त ४४ मिनिटांत विजयाची नोंद केली.

महिला एकेरीत शारापोव्हाने अमेरिकेच्या लॉरिन डेव्हिसविरुद्ध ६-१, ६-७ (५/७), ६-० असा ऐतिहासिक विजय साजरा केला, मात्र त्याआधी विश्रांतीच्या काळात पोशाख बदलून ती अवतरली. दुसऱ्या सेटमध्ये शारापोव्हाला अतिशय झगडायला लागले. मात्र त्यानंतर तिने दिमाखात खेळ केला. चौथ्या फेरीत स्वित्र्झलडच्या बेलिंडा बेनसिकविरुद्ध तिचा सामना होणार आहे.

सेरेना विल्यम्सने रशियाच्या युवा दारिया कसाटकिनाचा ४४ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-१, ६-१ असा सहज पराभव केला. तसेच चौथ्या मानांकित अ‍ॅग्निस्का रडवान्सकाने सलग नऊ गेम जिंकताना मोनिया पुइगचा ६-४, ६-० असा पराभव केला.

अव्वल मानांकित आणि गतविजेत्या जोकोव्हिचने आंद्रेस सेप्पीविरुद्ध दोनतृतीयांश सेट पॉइंट वाचवल्यानंतर सलग चार गुण घेत ६-१, ७-५, ७-६ (८/६) अशा फरकाने विजय मिळवला. इटलीच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध जोकोव्हिचने हा ३३ वा सलग विजय नोंदवला. गेल्या वर्षी तिसऱ्या फेरीत रॉजर फेडररसारख्या दिग्गज टेनिसपटूला चकवणाऱ्या सेप्पीविरुद्ध दहा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोव्हिचने आत्मविश्वासाने तोंड दिले.

जपानच्या केई निशिकोरीने गुलेर्मो गार्सिया-लोपेझचा ७-५, २-६, ६-३, ६-४ असा पराभव केला, तर जो-विल्फ्रेड त्सोंगाने फ्रान्सच्या पियरी-ह्युग्युएस हर्बर्टला ६-४, ७-६ (९/७), ७-६ (७/४) असे हरवले.