मरे, वॉवरिन्का, इव्हान्सची आगेकूच; कर्बर, व्हीनस, गार्बिन चौथ्या फेरीत; सानिया-बाबरेराची यशस्वी वाटचाल

वलयांकित, लौकिकाला साजेसा शैलीदार खेळ आणि १७ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत चौथी फेरी गाठली. अव्वल दहा मानांकन लाभलेले टेनिसपटू एकेक गुणासाठी संघर्ष करत असताना फेडररने टॉमस बर्डीचवर सरळ सेट्समध्ये सहज विजय मिळवत वेगळेपण सिद्ध केले. अन्य लढतींमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अव्वल मानांकित अ‍ॅण्डी मरे, स्टॅनिसलॉस वॉवरिन्का, डॅनिएल इव्हान्स, केई निशिकोरी यांनीही चौथ्या फेरीत प्रवेश केला. महिलांमध्ये अव्वल मानांकित अँजेलिक कर्बर, व्हीनस विल्यम्स, गार्बिन म्युगुरुझा यांनी चौथ्या फेरीत आगेकूच केली.

दुखापतीमुळे गेल्या वर्षी प्रदीर्घ काळ खेळू न शकलेल्या फेडररला १७वे मानांकन देण्यात आले आहे. दुसरीकडे प्रतिस्पर्धी बर्डीचला दहावे मानांकन मिळाले होते. या दोघांच्या लढतींच्या इतिहासात फेडरर आघाडीवर होता. पस्तीशीच्या फेडररने जेमतेम दीड तासांत ३१ वर्षीय बर्डीचवर ६-२, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. कोर्टवर सर्वागीण वावरासह खणखणीत सव्‍‌र्हिस, बहारदार परतीचे फटके, नेटजवळचा सुरेख या गुणवैशिष्टय़ांच्या बळावर फेडररने सहज विजयाची नोंद केली. पुढच्या फेरीत फेडररची लढत जपानच्या केई निशिकोरीशी होणार आहे.

मरे, वॉवरिन्का चौथ्या फेरीत

नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या अव्वल मानांकित मरेला विजयासाठी संघर्ष करावा लागला. या स्पर्धेत सलग सहावेळा अंतिम फेरी गाठूनही मरेला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे.

गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेत जोकोव्हिचला पराभवाचा धक्का देणाऱ्या सॅम क्वेरीविरुद्धच मरेची लढत होती. मरेने ही लढत ६-४, ६-२, ६-४ अशी जिंकली. मात्र क्वेरीने टिच्चून खेळ करत मरेला टक्कर दिली. पुढच्या फेरीत मरेची लढत मिशचा व्हरेव्हशी होणार आहे. चौथ्या मानांकित स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने व्हिक्टर ट्रॉइकीचा ३-६, ६-२, ६-२, ७-६ (९-७) असा पराभव केला. ट्रॉइकीने दिमाखदार खेळ करत पहिला सेट जिंकला. यामुळे वॉवरिन्कावरील दडपण वाढले. मात्र पुढच्या तीन सेटमध्ये जोरदार खेळ करत ट्रॉइकीला निष्प्रभ ठरवले. १२व्या मानांकित जो विल्फ्रेड सोंगाने जॅक सॉकवर ७-६ (७-४), ७-५, ६-७ (८-१०), ६-३ अशी मात केली. पाचव्या मानांकित केई निशिकोरीने ल्युकास लाकोला ६-४, ६-४, ६-४ असे नमवले. डॅनियल इव्हान्सने ऑस्ट्रेलियाच्या बरनार्ड टॉमिकवर ७-५, ७-६ (७-२), ७-६ (७-३) असा विजय मिळवत चौथी फेरी गाठली.

कर्बर सुसाट

महिलांमध्ये अव्वल मानांकित अँजेलिक कर्बरने क्रिस्तिना प्लिसकोव्हाचे आव्हान ६-०, ६-४ असे संपुष्टात आणले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कर्बरने लौकिकाला साजेशा खेळ करत झटपट विजय साकारला. व्हीनस विल्यम्सने यिंग यिंग डय़ुआनचा ६-१, ६-० असा धुव्वा उडवला. गार्बिन म्युगुरुझाने अ‍ॅनास्तासिजा सेव्हासटोव्हावर ६-४, ६-२ अशी मात केली. सोराना सिरस्टीने अ‍ॅलिसन रिस्कचा ६-२, ७-६ (६-२) असा पराभव केला.

सानियाची आगेकूच

भारताची सानिया मिर्झा आणि तिची सहकारी बाबरेरा स्ट्रायकोव्हा जोडीने समंथा स्टोसूर व शुआई झांग जोडीवर ६-१, ६-४ असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत त्यांची लढत इरी हाझुमी-मियू काटो जोडीशी होणार आहे. दरम्यान, अ‍ॅलेक्स बोल्ट- ब्रॅडले मौसले जोडीने रोहन बोपण्णा -पाब्लो क्युव्हेस जोडीला २-६, ७-६ (७-२), ६-४ असे नमवले.