एकीकडे ताकदवान खेळ, तर दुसरीकडे कलात्मक खेळ यांच्यातील महामुकाबल्यात श्रेष्ठ कोण ठरणार शनिवारी सिद्ध होईल. सेरेना विल्यम्स व मारिया शारापोव्हा या दोन रणरागिणी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाच्या लढतीत एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. द्वितीय मानांकित शारापोव्हापेक्षा अग्रमानांकित सेरेनाचे पारडे जड मानले जात आहे.
ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये आतापर्यंत १८ अजिंक्यपदे मिळवणाऱ्या सेरेनाला विजेतेपदाची अधिक संधी असली तरी उपांत्य फेरीत तिला अमेरिकेच्याच मॅडीसन की हिने झगडायला लावले होते. हीच शारापोव्हासाठी मानसिक धैर्य उंचावणारी गोष्ट आहे. जागतिक टेनिस क्षेत्रातील सध्याच्या घडीच्या या दोन अव्वल खेळाडूंमध्ये होणारी अंतिम लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे.
सेरेनाने आतापर्यंत शारापोव्हाविरुद्ध झालेल्या १८ सामन्यांपैकी १६ सामने जिंकले आहेत, त्यापैकी तिने गेल्या १५ सामन्यांमध्ये शारापोव्हाला विजय मिळवण्यापासून वंचित ठेवले आहे. या १५ सामन्यांमध्ये तिने सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळवले आहेत. शारापोव्हाने २००४मध्ये वयाच्या १७व्या वर्षी विम्बल्डन स्पर्धा जिंकताना सेरेनावरच अंतिम फेरीत सनसनाटी विजय मिळवला होता. त्याच वर्षी डब्ल्यूटीए मालिका अंतिम फेरीतही शारापोव्हाने याच विजयाची पुनरावृत्ती केली होती. या विजेतेपदानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये शारापोव्हाने अन्य ग्रँड स्लॅम स्पर्धामध्येही विजेतेपद मिळविले आहे.
स्टेफी ग्राफने ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये एकेरीची २२ विजेतेपदे मिळविली आहेत. सेरेनाची त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. ३३व्या वर्षीही सेरेना हीच जगातील अव्वल मानांकित खेळाडू आहे. हीच तिच्याबाबतची खासियत आहे. व्यावसायिक टेनिस स्पर्धामध्ये युवा खेळाडूंचा बोलबाला होत असला तरी अजूनही आपणच सर्वोत्तम खेळाडू असल्याचा प्रत्यय तिने घडवला आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या अंतिम फेरीत ती पूर्ण ताकदीनिशी खेळ करीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला फारशी संधी देत नाही. त्यामुळेच शारापोव्हा तिच्या आक्रमक खेळास कशी तोंड देते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. खुद्द शारापोव्हादेखील सेरेनाच्या आक्रमक खेळाची चाहती आहे.

‘‘ताकदवान व वेगवान खेळामुळेच सेरेनाविरुद्ध अंतिम फेरीत खेळणे ही आव्हानात्मक गोष्ट आहे. परतीचे फटके हे तिचे हुकमी शस्त्र आहे. त्याकरिता तिला फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. तिच्याइतकी मी तुल्यबळ खेळाडू नाही, हे मी मान्य करते, मात्र मीदेखील एक स्पर्धक आहे व त्यामुळेच मी तिला चांगली लढत देण्यासाठी उत्सुक झाली आहे.’’  
-मारिया शारापोव्हा