भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत त्यानं धडक दिली आहे. त्यानं उपांत्यफेरीत चीनच्या शी युकीला २१-१०, २१-१४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं. श्रीकांतनं यावर्षी लागोपाठ तिसऱ्यांदा सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यांत धडक मारली आहे. याआधी त्याला सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर इंडोनेशिया ओपनमध्ये जेतेपद पटकावलं होतं.

तत्पूर्वी, पहिल्या सेटमध्ये श्रीकांतनं ११-७ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर श्रीकांतनं युकीला संधीच दिली नाही. चांगला खेळ करत श्रीकांतनं पहिला सेट २१-१० ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये एक वेळ अशी होती की, दोघांनीही ७-७ गुण मिळवले होते. पण श्रीकांतनं आपलं वर्चस्व राखत सेटमध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. सेटच्या मध्यांतरानंतर श्रीकांतनं पुन्हा सुंदर खेळी केली आणि २०-१३ अशी आघाडी घेत सामना एकतर्फी केला. त्यानंतर शी युकीनं १ गुण मिळवला. पण श्रीकांतनं लगेच १ गुण मिळवून दुसरा सेटही जिंकला आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. अंतिम सामन्यात श्रीकांतची लढत चेन लाँग आणि ली ह्यून इल यांच्यात जो विजयी ठरेल त्याच्याशी होणार आहे.