संभाव्य विजेत्या गणल्या जाणाऱ्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सला चौथ्या फेरीचा अडथळा पार करताना झुंजार लढत द्यावी लागली. याशिवाय तिची बहीण व्हीनस, नोव्हाक जोकोव्हिच व स्टॅनिसलास वॉवरिन्का यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील चौथ्या फेरीकडे वाटचाल केली. मात्र चौथ्या मानांकित पेत्रा क्विटोवाला अमेरिकेच्या मेडीसन कीजने पराभवाचा धक्का दिला.
सेरेनाने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाला ४-६, ६-२, ६-० असे पराभूत केले. पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने खेळावर नियंत्रण मिळवत उर्वरित दोन्ही सेट्स सहज जिंकले. सेरेनाला पुढच्या फेरीत स्पेनच्या गेर्बिन मुगुरुझाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गेर्बिनने स्वित्र्झलडच्या तिमिया बास्कीनस्कीला ६-३, ४-६, ६-० असे हरवले. चौदाव्या मानांकित व्हीनसला इटलीच्या कॅमिला जिओर्जीच्याविरुद्ध विजय मिळवताना झगडावे लागले. तिने हा सामना ६-४, ६-७ (३-७), ६-४ असा जिंकला. तिला आता अग्नीझेका राडवानस्का हिच्याशी खेळावे लागणार आहे. राडवानस्काने अमेरिकेच्या वार्वरा लेपचेन्को हिच्यावर ६-०, ७-५ अशी मात केली.
 चेक प्रजासत्ताकची खेळाडू क्विटोवाला मेडीसनने केलेल्या आक्रमक खेळापुढे अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नाही. क्विटोवाने हा सामना ४-६, ५-७ असा गमावला. व्हिक्टोरिया अझारेन्काने विजयी वाटचाल कायम राखली. तिने चेक प्रजासत्ताकच्या झाहलोवोवा स्ट्रायकोवा हिचा ६-४, ६-४ असा पराभव केला. पाचव्या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या जोकोव्हिचलाही स्पेनच्या फर्नाडो वेर्दास्कोविरुद्ध विजयासाठी झगडावे लागले. जोकोव्हिचने ही लढत ७-६ (१०-८), ६-३, ६-४ अशी जिंकली. गतविजेत्या वॉवरिन्काने अपराजित्व टिकविताना फिनलंडच्या जाकरे नेमीनेनचा ६-४, ६-२, ६-४ असा सरळ तीन सेट्समध्ये पराभव केला. नवव्या मानांकित डेव्हिड फेरर यानेही चौथी फेरी गाठली. त्याने फ्रान्सच्या गिल्स सिमोनचे आव्हान ६-२, ७-५, ५-७, ७-६ (७-४) असे संघर्षपूर्ण लढतीनंतर संपुष्टात आणले.

मिश्र दुहेरीत भूपती पराभूत
भारताच्या महेश भूपती व त्याची ऑस्ट्रेलियन सहकारी जेर्मिला गाजदोसोवा यांना मिश्रदुहेरीत पराभवाचा धक्का बसला. हाओ चिंग चान व जेमी मरे यांनी त्यांचा ४-६, ७-६ (९-७), १०-८ असा रोमहर्षक लढतीनंतर पराभव केला. कनिष्ठ मुलींच्या गटात भारताच्या प्रांजला येडियापल्लीने दक्षिण आफ्रिकेच्या केटी पोलुता हिचा ६-४, ६-३ असा पराभव करीत आव्हान राखले. मात्र तिची सहकारी ओजस्विनी सिंगला अमेरिकेच्या ऑलिव्हिया हॉगरने ०-६, ६-४, ६-१ असे पराभूत केले. मुलांमध्ये सुमीत नागपाल याने अपराजित्व राखताना अमेरिकेच्या मायकेल मिमोह याचा ६-२, ४-६, ६-४ असा पराभव केला.