श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने कसोटीवरील आपली पकड घट्ट केली आहे. विजयासाठी मिळालेल्या ३९३ धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या २ बाद ६५ धावा झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आठ विकेट्सची आवश्यकता आहे तर श्रीलंकेला अजूनही ३२८ धावांची गरज आहे.
बिनबाद २७ वरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेच्या गोलंदाजांनी मोठी मजल मारू दिली नाही. इड कोवान आणि डेव्हिड वॉर्नरने शतकी भागीदारी केली. मात्र फिरकीपटू रंगना हेराथने वॉर्नरला बाद करत ही जोडी फोडली. वॉर्नरने ६८ धावांची खेळी केली. त्यानंतर लगेचच वेलगेडराने कोवानला त्रिफळाचीत केले. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाची घसरगुंडी उडाली.
कर्णधार मायकेल क्लार्कने अर्धशतकी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मांडीच्या दुखापतीमुळे तो निवृत्त झाला. माइक हस्सीने नाबाद ३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव २७८ धावांत संपुष्टात आला. रंगना हेराथने ९६ धावांत ५ बळी टिपले. वेलगेडराने ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
विजयासाठी ३९३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य मिळालेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. मिचेल स्टार्कने दिमुख करुणारत्नेला तर वॉटसनने दिलशानला बाद करत श्रीलंकेला धक्का दिला. मात्र यानंतर महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांनी संयमी भागीदारी करत पडझड टाळली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा संगकारा १८ तर जयवर्धने ५ धावांवर खेळत आहेत.