शेन वॉटसनच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर ३९ धावांनी मात केली. या विजयासह पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३२९ धावांचा डोंगर उभारला. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या शेन वॉटसनने १२ चौकार आणि २ षटकारांसह १२२ धावांची खेळी साकारली. फिलीप ह्य़ूजने ८६ धावा करत वॉटसनला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी रचली. जॉर्ज बेलीने ६ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा फटकावत ऑस्ट्रेलियाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. वेस्ट इंडिजतर्फे डॅरेन सॅमी आणि सुनील नरिन यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा डाव २९० धावांवर संपुष्टात आला. डॅरेन ब्राव्होने ८६ तर ड्वेन ब्राव्होने ५१ धावांची खेळी केली. हे दोघे मैदानात असेपर्यंत वेस्ट इंडिजला विजयाची आशा होती. मात्र दहा धावांच्या अंतराने हे दोघे माघारी परतले आणि वेस्ट इंडिजच्या डावाची घसरगुंडी उडाली. ऑस्ट्रेलियातर्फे जेम्स फॉल्कनरने ४८ धावांत ४ बळी टिपले. शतकी खेळी साकारणाऱ्या वॉटसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.