श्रीलंकाविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय फलंदाजीचा मनसोक्त आनंद क्रिकेट चाहत्यांना घेता आला नसला तरी भारताच्या अ संघाने दक्षिण आफ्रिकेच्या अ संघाविरुद्ध अनौपचारिक कसोटी सामन्यात अफलातून कामगिरीचा नजराणा पेश करीत क्रिकेटप्रेमींचा आजचा दिवस सार्थकी लावला. दक्षिण आफ्रिकेच्या अ संघाला भारताच्या अ संघाने एक डाव आणि ८१ धावांनी पराभूत केले. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल विजयाचा शिल्पकार ठरला. अक्षरच्या फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी हात टेकले. या सामन्यात अक्षरने सहा षटकांमध्ये एकही धाव न देता आफ्रिकेच्या चार खेळाडूंना बाद केले. अक्षरची ही कामगिरी पाहून आफ्रिकेच्या खेळाडूंवर तोंडात बोटं घालण्याची वेळ आली. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या या अनौपचारिक कसोटी सामन्यात भारताच्या अ संघाने पहिल्या डावात १५७ धावा केल्या होत्या. दुसऱया डावात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या ७६ धावांत तंबूत परतला. आफ्रिकेचे पहिल्‍या फळीतील आठ फलंदाज वैयक्‍तिक दहा धावांचा आकडाही पार करू शकले नाहीत. अक्षरने सामन्यात केवळ ६ षटके टाकली आणि या सहा षटकांमध्ये द.आफ्रिकेच्या फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. उलट, अक्षरने चार फलंदाजांना आपल्या फिरकी जाळ्यात ओढले. तर जयंत यादवने दोन गडी बाद केले. तसेच शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा, बाबा अपराजित यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.