लंडन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारा धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिच्या खुनाच्या सुनावणीदरम्यान दक्षिण आफ्रिका दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
चार दिवस चाललेल्या या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायाधीश डेस्मंड नायर यांनी पिस्टोरियसची जामिनावर मुक्तता केली. ‘‘पिस्टोरियसला जामिनावर सोडल्याने कोणताही धोका उद्भवणार नाही. पिस्टोरियस खरे बोलतोय की खोटे, यावरच या प्रकरणाचा निकाल अवलंबून आहे,’’ असे नायर यांनी सांगितले. ‘ब्लेड रनर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिस्टोरियसने ‘व्हॅलेंटाइन डे’ला रिव्हाचा खून केल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली होती. रिव्हाचा खून हा पूर्वनियोजित होता, या आरोपांमुळे पिस्टोरियसला जवळपास आठवडाभर तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी दोषी आढळल्यास पिस्टोरियसला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
पिस्टोरियसला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. ‘‘त्याला जामीन देण्याचा न्यायालयाचा निर्णय योग्य म्हणावा लागेल,’’ असे त्याचे वकील बॅरी रॉक्स यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या मते, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवायला हवे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी हिल्टन बोथा यांच्यावरच खुनाचे आरोप असल्यामुळे त्यांना हटवण्यात आले आहे. त्यांची जागा आता वरिष्ठ लेफ्टनंट कर्नल विनेशकुमार मुनू घेणार आहेत.