भारताचे कुस्तीपटू बजरंग कुमार आणि बबिता कुमारी पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पध्रेसाठी पात्र ठरले आहेत. सोनपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) सराव केंद्रात पार पडलेल्या निवड चाचणी स्पध्रेत या दोघांनी आपापल्या गटात बाजी मारली.
बजरंगने ६१ किलो फ्रिस्टाइल विभागात सोनूचा ४-० असा पराभव केला, तर बबिताने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात निर्मला देवीवर ६-२ असा विजय मिळवला. ७ ते १२ सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेतील लास वेगास येथे जागतिक कुस्ती स्पर्धा होणार असून रिओ ऑलिम्पिकसाठीची ही पहिली पात्रता फेरी आहे.
गेल्या महिन्यात भारतीय कुस्ती महासंघाकडून जागतिक अजिंक्यपद स्पध्रेकरिता घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पध्रेत बजरंग आणि बबिता यांना दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते. मात्र, त्यांच्या विनंतीचा विचार करून आणि पूर्वकामगिरीचा विचार करून निवड समितीने या निवड चाचणीतील विजेत्यांना कझाकस्तानमध्ये झालेल्या वरिष्ठ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेतच खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे सोनू (६१ किलो पुरुष) आणि निर्मला देवी (५३ किलो महिला) यांना वरिष्ठ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेत खेळण्याची संधी मिळाली. मात्र, जागतिक कुस्ती स्पध्रेसाठी
वरील विभागांसाठी पुन्हा निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली आणि त्यात बजरंग आणि बबिताने बाजी मारली.
२०१२च्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत कांस्यपदक विजेत्या बबिताला गतवर्षी झालेल्या आशियाई स्पध्रेत घोटय़ाला दुखापत झाली होती, तर राष्ट्रकुल स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या बजरंग पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. बजरंगने २०१३च्या जागतिक कुस्ती स्पध्रेत कांस्यपदक पटकावले होते.

आता मी तंदुरुस्त आहे. गेल्या काही दिवसांत पाठीच्या दुखण्यातून सावरण्यासाठी मी कठोर मेहनत घेतली. मी याआधी जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत कांस्य जिंकले आहे, परंतु या वेळी सुवर्णपदक आणि रिओ ऑलिम्पिकची पात्रता हे लक्ष्य डोळ्यांसमोर आहे. जागतिक स्पध्रेकरिता आणखी एक महिन्याचा कालावधी आमच्याकडे आहे आणि प्रशिक्षक प्रत्येक पैलूवर कसून काम करीत आहेत.
– बजरंग  कुमार