‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे गेले काही दिवस मीसुद्धा चिंतेत होतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी मीही अल्लाकडे प्रार्थना करीत होतो. त्यांच्या निधनामुळे मला फार जवळचा माणूस हरपल्याचे दु:ख झाले आहे,’’ अशी भावना व्यक्त करतानाच, पुढील महिन्यात पाकिस्तानी संघ बहुप्रतीक्षित भारत दौऱ्यावर जाणार आहे. मीसुद्धा पाकिस्तानी संघासोबत या दौऱ्यावर असेन. त्यावेळी पाकिस्तानी क्रिकेट संघासोबत मी निश्चितपणे ‘मातोश्री’वर ठाकरे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी जाणार आहे, असे पाकिस्तानचा माजी संघनायक जावेद मियाँदाद यांनी सांगितले.
पाकिस्तानशी क्रिकेटचे संबंधही तोडून टाका, हा ठाकरे यांचा ज्वलंत हुंकार. पण याच बाळासाहेबांना पाकिस्तानचा माजी कसोटीपटू जावेद मियाँदादविषयी विलक्षण प्रेम होते. २००४मध्ये मियाँदादने मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या घटनेची बरीच चर्चा झाली होती. त्याविषयी मियाँदाद म्हणाला की, ‘‘माझे आणि ठाकरे यांचे फार चांगले संबंध होते. मी पाकिस्तानी आणि मुसलमान असूनही त्यांनी माझ्यावरील प्रेमाखातर मला भेटायला बोलावले होते. बाळासाहेब स्वत: दारापाशी माझ्या स्वागताला आले होते. राज ठाकरे यांनीही क्रिकेटबाबत माझ्याशी छान चर्चा केली. संपूर्ण कौटुंबिक वातावरणात माझा पाहुणचार झाला. मी सुमारे चार तास ठाकरे कुटुंबीयांसमवेत घालवले. त्यांच्यासोबत भोजनही घेतले. त्या आठवणी आज क्षणभर नजरेसमोर तरळल्या आणि डोळ्यांत पाणी आले.’’
‘‘राजकारण हे काही बालपणापासून माणूस घेऊन येत नसतो. पण खेळ हा लहानपणापासून माणसाची सोबत करतो. पाकिस्तानी संघाच्या बाबतीत त्यांनी राजकारणाचा भाग म्हणून अनेक वक्तव्ये केली. पण प्रत्यक्षात खेळ आणि खेळाडूंवरील त्यांचे प्रेम कधीही कमी झाले नाही. या राजकारणाचा कधीही क्रिकेटला प्रत्यक्षात फटका बसला नाही, इतकी काळजी ते नक्की घ्यायचे,’’ असे मियाँदादने सांगितले.
१९८६मध्ये शारजात चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून मियाँदादने विजयाचा घास भारताच्या तोंडातून हिरावून घेतला होता. ‘‘त्यावेळी ‘आपने शारजा में कमाल कर दिया था,’ अशा शब्दांत ठाकरे यांनी माझे कौतुक केले होते. त्या भेटीमध्ये बाळासाहेबांनी माझ्या खेळाची मुक्तकंठाने तारीफ केली होती. क्रिकेटविषयीचे त्यांचे ते प्रेम पाहून माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला,’’ असे मियाँदाद यांनी सांगितले. ‘‘बाळासाहेब हे माझ्यासाठी खास होते. पाकिस्तानात क्रिकेट सामने पाहायला या, असे निमंत्रण मी त्यांना अनेकदा दिले होते. सच्चा क्रिकेटरसिक गेल्यामुळे हे दु:ख मोठे आहे,’’ असेही मियाँदाद म्हणाले.    

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेबांचे योगदान मौल्यवान आहे. त्यांच्या जाण्याने न भरून काढण्यासारखे नुकसान झाले आहे. त्यांची उणीव सदैव भासत राहील आणि त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. बाळासाहेबांचे अखेरचे दर्शन घेण्याची माझी इच्छा होती. पण दुर्दैवाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी मी अहमदाबादमध्ये आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. बाळासाहेबांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
-सचिन तेंडुलकर, महान क्रिकेटपटू.