ऑलिम्पिकमध्ये तीन वेळा सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय हॉकी संघातील ज्येष्ठ खेळाडू बलबीरसिंग (वरिष्ठ) यांचे आत्मचरित्र युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायक ठरेल, असे त्यांच्या कन्या सुशबीर भोमिया यांनी सांगितले.
पंजाब पोलीस दलात वरिष्ठ पदावर व त्यानंतर पंजाबच्या क्रीडा विभागाचे संचालक म्हणून बलबीर यांनी काम केले. त्यांनी लंडन (१९४८), हेलसिंकी (१९५२) व मेलबर्न (१९५६) येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांनी १९५२च्या ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यात पाच गोल करीत विक्रम नोंदविला होता. हा विक्रम अद्यापही मोडला गेलेला नाही. बलबीर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन लवकरच पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या हस्ते होणार आहे. या आत्मचरित्रामध्ये हॉकीबरोबरच बलबीर यांनी अश्वारोहणात केलेल्या कामगिरीचाही आढावा घेण्यात आला आहे.
बलबीर यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे अनेक वेळा ते तुरुंगातच असत. अशा प्रतिकूल परिस्थितीत बलबीर यांना बालपण काढावे लागले. मोगा येथे शालेय शिक्षण घेत असताना ज्येष्ठ प्रशिक्षक हरबेलसिंग यांनी बलबीर यांच्याकडील नैपुण्य पाहून त्यांना हॉकीमध्ये आणले. तेथूनच बलबीर यांची हॉकी कारकीर्द सुरू झाली. हॉकीची कारकीर्द घडत असताना त्यांना करावा लागलेला संघर्ष, हॉकीतून निवृत्त झाल्यानंतर शासकीय नोकरीत काम करताना आलेले अनुभव याचे वर्णन या आत्मचरित्रात देण्यात आले आहे.