आयुष्यभराची पुंजी आपण मोठय़ा विश्वासाने एखाद्याकडे सुपूर्द करावी आणि त्या विश्वासाला तिलांजली देत ती नाहीशी करावी.. याहून अधिक वेदनादायक आणि हृदयाला छेद पाडणारी घटना कोणाच्या बाबतीत घडली तर त्या व्यक्तीची अवस्था कशी होईल, याचे ज्वलंत उदाहरण भारताचे माजी ऑलिम्पिक हॉकीपटू बलबीर सिंग (वरिष्ठ) हे ठरले आहेत. १९८५च्या ऑलिम्पिकमधील नायक बलबीर सिंग यांनी त्यांची पदकं, ऑलिम्पिक ब्लेझर, दुर्मीळ छायाचित्रे, स्मृतिचिन्हे आदी संग्रहालयासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साइ) दान केले होते. इतक्या वर्षांनंतर संग्रहालय तर बनलेच नाही, तर बलबीर सिंग यांचा हा ठेवाच हरवल्याचे साइकडून सांगण्यात आल्याने बलबीर सिंग यांना जबर धक्का बसला आहे.
तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ९१ वर्षीय बलबीर सिंग यांनी त्यांची पदकं आणि स्मृतिचिन्हे राष्ट्रीय क्रीडा संग्रहालयात ठेवण्यासाठी साइ सचिवांना दान केली होती. त्यानंतर युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी दिल्लीत संग्रहालय उभे राहणार असून त्यामध्ये ती ठेवण्यात येतील, असे बलबीर सिंग यांना नंतर सांगण्यात आले होते, परंतु दि ऑलिम्पिक संग्रहालयाच्या विनंतीवरून २०१२च्या लंडन ऑलिम्पिक स्पध्रेपूर्वी या पदकांची आणि स्मृतिचिन्हांची साइकडे विचारणा केली असता याबाबत काहीच माहीत नसल्याचे त्यांनी दर्शविले.
केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी साइ अधिकाऱ्यांसह बलबीर सिंग वरिष्ठ यांची चंदीगढ येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन सोनोवाल यांनी दिले होते.
त्याच दरम्यान पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातील वकिलांच्या गटाने नवी दिल्ली येथील साइ आणि पटियाला येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील (एनआयएस) अधिकाऱ्यांविरोधात ‘माहितीचा अधिकार मोहीम’ सुरू केली. या दोन्ही संस्थांकडून थक्क करणारी माहिती समोर आली. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरात परस्पर भिन्नता आढळली आहे. मात्र, बलबीर सिंग वरिष्ठ यांनी साइला सुपूर्द केलेल्या स्मृतिचिन्हाच्या वृत्ताला दुजोरा देणारी कागदपत्रे सापडली आहेत. ऑलिम्पिक पदक आणि पद्म श्री पुरस्कारवगळता बलबीर सिंग यांनी त्यांच्याकडील सर्व पुंजी साइकडे सुपूर्द केली होती. त्यात मेलबर्न ऑलिम्पिकमधील कर्णधाराचा ब्लेझर, टोकियो आशियाई स्पध्रेतील (१९५८) रौप्यपदकासह ३६ पदके आणि १०० हून अधिक दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश होता.
बलबीर यांचा नातू कबीर भोमिआ म्हणाला, ‘‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ऑलिम्पिक संग्रहालयाला मेलबर्न स्पध्रेतील ब्लेझर लंडन ऑलिम्पिमध्ये प्रदर्शनासाठी हवा होता. मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये १६ दिग्गज खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय हॉकीपटू म्हणून बलबीर यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे
आम्ही आजोबांचा ब्लेझर मिळवण्यासाठी साइशी संपर्क साधला, परंतु अधिकाऱ्यांनी याबाबत आम्हाला काहीच माहीत नसल्याचे सांगितले.’’
‘‘ही घटना काळिमा फासणारी आहे. ही स्मृतिचिन्हे आपल्या राष्ट्रीय क्रीडाचा वारसा होती आणि अशा प्रकारची घटना अमूल्य स्मृतिचिन्हांसोबत घडत असल्यास, ती दुर्लक्षित करून चालणार नाही. याला जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करायला हवा, असे मत क्रीडा समाजशास्त्रज्ञ आणि बलबीर सिंगचे सहकारी प्राध्यापक सुदेश गुप्ता यांनी व्यक्त केले.

१९५२च्या ऑलिम्पिक स्पध्रेत सुवर्णपदकाच्या लढतीत बलबीर सिंग यांच्या पाच गोलच्या बळावर भारताने नेदरलँडचा ६-१ असा धुव्वा उडविला होता.