कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या दमदार दीडशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारताविरुद्धच्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ९ बाद ३२९ अशी मजल मारली आहे. या सन्मानजनक धावसंख्येच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची दमदार आघाडी घेतली आहे. भारताकडून युवा अष्टपैलू बाबा अपराजितने अचूक मारा करत पाच बळी मिळवण्याची किमया साधली असून त्याला तीन बळी घेत डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने चांगली साथ दिली.
दुसऱ्या दिवसाची बिनबाद ४३ या धावसंख्येवरून बॅनक्रॉफ्ट आणि कर्णधार उस्मान ख्वाजा (३३) यांनी चांगली सुरुवात करून देत शतकी सलामी दिली. ख्वाजा बाद झाल्यावर मात्र त्यांनी १२ धावांमध्ये दोन बळी गमावले; पण त्यानंतर बॅनक्रॉफ्टला कॅलम फग्र्युसनने (५४) अर्धशतक झळकावत सुरेख साथ दिली आणि संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. बॅनक्रॉफ्टने या वेळी संघाची कमान उत्तम पद्धतीने सांभाळत १६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १५० धावांची अप्रतिम खेळी साकारली, त्याचा काटा काढला अपराजितनेच. आपल्या ‘ऑफ-स्पिन’ गोलंदाजीच्या जोरावर अपराजितने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या धावांना वेसण घालण्याचे काम बजावले.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ (पहिला डाव) : १३५.
ऑस्ट्रेलिया ‘अ’ (पहिला डाव): १०३ षटकांत ९ बाद ३२९ (कॅमेरून बॅनक्रॉफ्ट १५०, कॅलम फग्र्युसन ५४; बाबा अपराजित ५/७४, प्रग्यान ओझा ३/९९).