बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अराफत सनी यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातल्यामुळे बांगलादेशचा कर्णधार मश्रफ मुर्तझा याला रविवारी आपले अश्रू अनावर झाले. संघातील महत्त्वाच्या गोलंदाजांना टी २० विश्वचषकाच्या पुढील सामन्यांमध्ये खेळता येणार नसल्याने त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही होण्याची शक्यता आहे.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अराफत सनी यांच्यावर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीचा ठपका ठेवण्यात आला होता. टी-२० विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात बांगलादेशने ८ धावांनी विजय मिळवला होता. तस्किन आणि सनी यांची चेन्नई येथील आयसीसीची मान्यता असलेल्या चाचणी केंद्रात स्वतंत्र चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर दोन्ही गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तस्किन आणि सनी हे दोघेही चेन्नईमधील चाचणीत नक्की उत्तीर्ण होतील, असा बांगलादेशच्या क्रिकेट व्यवस्थापनाला विश्वास होता. पण या दोघांनाही संशयास्पद गोलंदाजीचा ठपका ठेवून त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे संघाला मोठा फटका बसला आहे. त्यातही संघामध्ये तस्किनला खेळता येणार नसल्याचे बांगलादेशच्या क्रिकेटपटूंना विशेष वाईट वाटते आहे. आयसीसीने दिलेल्या निर्णयाचा आदर राखण्याचे बांगलादेशच्या क्रिकेट संघाने निश्चित केले असून, या निर्णयाबद्दल पुढील भूमिका बांगलादेश क्रिकेट व्यवस्थापनानेच ठरवावी, असेही संघाने ठरविले आहे.