सलामीवीर किरान पॉवेलने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही शतक झळकावले. पण त्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाला बांगलादेशने सुरुंग लावला. त्यामुळे पहिली कसोटी शनिवारी अखेरच्या दिवशी निर्णायक होण्याच्या आशा बळावल्या आहेत.
२२ वर्षीय फलंदाज पॉवेलने सामन्यातील दुसरे शतक साकारताना ११० धावा केल्या. त्यामुळेच चौथ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजला ६ बाद २४४ धावा उभारता आल्या. आता विंडीजकडे २१५ धावांची आघाडी असून, पाचवा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
शुक्रवारी सकाळी बांगलादेशचा पहिला डाव ५५६ धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजने आपला पहिला डाव ४ बाद ५२७ धावसंख्येवर घोषित केला होता. त्यामुळे बांगलादेशला २९ धावांची छोटेखानी आघाडी मिळाली. पहिल्या डावात ११७ धावांची खेळी साकारणाऱ्या पॉवेलने दुसऱ्या डावात आपली खेळी साकारताना दुसऱ्या विकेटसाठी डॅरेन ब्राव्हो (७६)सोबत १८९ धावांची भागीदारी रचली. पण डावखुरा फिरकी गोलंदाज शाकिब अल हसनने पॉवेल आणि दिनेश रामदीन (५) यांचे बळी घेतले. याचप्रमाणे पदार्पणवीर सोहाग गाझीनेही दोन बळी घेतले. त्यामुळे विंडीजचा धावांचा ओघ मंदावला. त्यांचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल (१९) पुन्हा एकदा अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनने त्याचा बळी मिळवला.