बार्सिलोनाचा ३-२ असा निसटता विजय; लिओनेल मेस्सीचा ५००वा गोल

रिअल माद्रिद आणि बार्सिलोना या स्पेनमधील अव्वल क्लबमध्ये होणारा सामना म्हटला की त्यात रोमहर्षकतेबरोबर नाटय़मय वळणं, खिलाडूवृत्ती आलीच. त्यामुळेच या दोन मात्तबर क्लबच्या सामन्यांना ‘एल क्लासिको’ (उत्कृष्ट) असे संबोधिले जाते आणि हा सामना पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर जमतात. रविवारी मध्यरात्री माद्रिदच्या सँटियागो स्टेडियमवरही अफाट गर्दी जमली होती. माद्रिदच्या घरच्या मैदानावर हा सामना होत असल्याने साहजिकच ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते अधिक होते आणि या परिस्थितीत रोनाल्डोचा कट्टर प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीवर प्रचंड दडपण वाढले होते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत डोक शांत ठेवून लक्ष्याचा वेध घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मेस्सीने माद्रिद व रोनाल्डो चाहत्यांना जबर धक्का दिला. भरपाई वेळेतील अखेरच्या काही सेकंदात मेस्सीने विजयी गोल करून कारकीर्दीतल्या सर्व प्रकारच्या स्पर्धामध्ये मिळून ५००व्या गोलचा आनंद द्विगुणित केला.

ला लिगा स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत बार्सिलोना आणि माद्रिद यांचे समसमान ७५ गुण झाले असून या विजयाने पाहुण्यांनी अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. माद्रिदकडे एका सामन्याची जमेची बाजू असली तरी २-३ अशा पराभवामुळे त्यांचे जेतेपदाची वाटचाल खडतर बनली आहे. मेस्सीला रोखले की बार्सिलोनाचा पराभव निश्चित, ही रणनीती माद्रिदने आखली होती. त्यामुळे त्याला रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्यांच्या बचावपटूंकडून झाले. २१व्या मिनिटाला मार्सेलोजचा कोपरा लागून मेस्सीच्या तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे वातावरणात गंभीरता आलेली.

मैदानावर सांडलेल्या त्या रक्तांचा वचपा मेस्सी असा काढेल याची कल्पनाही माद्रिदच्या खेळाडूंना नव्हती. ३३व्या मिनिटाला मेस्सीने अप्रतिम गोल करून बार्सिलोनाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. मेस्सीने या गोलबरोबर माद्रिदविरुद्धचा तीन वर्षांचा गोलदुष्काळही संपुष्टात आणला. तत्पूर्वी, २८व्या मिनिटाला कार्लोस कॅसिमिरोने माद्रिदचे खाते उघडले होते.

पहिल्या सत्रात १-१ अशा बरोबरीनंतर माद्रिदच्या खेळाडूंनी मेस्सीला अडवण्याचे सातत्याने प्रयत्न केले. पण, मेस्सीने आपला झंझावात कायम राखला होता. स्थानिक नायक रोनाल्डोचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न बार्सिलोनाचा गोलरक्षकाने अचूकपणे अडवल्याने माद्रिदवरील दडपण वाढले होते. त्यात ७३व्या मिनिटाला इव्हान रॅकिटीकने बार्सिलोनाला २-१ अशा आघाडीवर आणले. सामन्याला १३ मिनिटे शिल्लक असताना मेस्सीला घातकरीत्या अडवल्याप्रकरणी माद्रिदचा कर्णधार सर्गिओ रामोसला लाल कार्ड दाखवून बाहेर करण्यात आले. ८५व्या मिनिटाला जेम्स रॉड्रीगेजने गोल करत सामना पुन्हा बरोबरीत आणला.

मात्र, नशिबाची साथ बार्सिलोनासोबत होती. दोन मिनिटांच्या भरपाई वेळेतील अखेरच्या सेकंदात मेस्सीने माद्रिदच्या खेळाडूंना चकवत अप्रतिम गोल केला आणि स्टेडियमवर स्मशानमय शांतता पसरली. माद्रिदच्या खेळाडूंनी मैदानावर लोटांगण घालून तोंड लपवली, तर रोनाल्डो हताश चेहऱ्याने मैदानाबाहेर गेला. विजयी गोलनंतर मेस्सीने जर्सी काढून प्रेक्षकांना डिवचले. या कृतीमुळे पंचांनी त्याला पिवळे कार्ड दाखवून ताकीद दिली.

  • १६एल क्लासिको लढतीत सर्वाधिक १६ गोल लिओनेल मेस्सीच्या नावावर आहेत. त्याने बार्सिलोनाच्याच अल्फ्रेडो डी स्टीफेनो (१४) यांचा विक्रम मोडला.
  • १२गोलरक्षक मार्क-अँड्रे टेर स्टीगन याने २००३-०४ मोसमानंतर सर्वाधिक १२ गोल अडवले आहेत.