२९ सामन्यांत अपराजित; व्हॅलेन्सियाविरुद्ध १-१ अशी बरोबरी
बार्सिलोना क्लबने सातत्यपूर्ण खेळ करताना कोपा डेल रे फुटबॉल स्पध्रेतील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लीग सामन्यात व्हॅलेन्सियाविरुद्ध १-१ अशी बरोबरी राखून ८-१ अशा सरासरीने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. या निकालाबरोबर बार्सिलोनाने सलग २९ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम नोंदवला. उपांत्य फेरीच्या पहिल्या लीगमध्ये बार्सिलोनाने व्हॅलेन्सियाचा ७-० असा धुव्वा उडवला होता.
गेल्या सहा वर्षांत पाचव्यांदा बार्सिलोनाने कोपा डेल रेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेयमार या यशस्वी त्रिकुटाच्या अनुपस्थितीत बार्सिलोनाने उल्लेखनीय कामगिरी केली.
३९व्या मिनिटाला व्हॅलेन्सियाच्या अल्व्हॅरो नेग्रेडोच्या गोलला बार्सिलोनाच्या विल्फ्रेड कॅप्टोमने ८४व्या मिनिटाला चोख उत्तर
देऊन सामना १-१ असा बरोबरीत सोडवला.

२९ : बार्सिलोनाने सलग २९ सामने अपराजित राहण्याचा विक्रम नोंदवून माजी प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांनी २०१०-११ सत्रात नोंदवलेला (२८) विक्रम मोडला.

८७ : ऑक्टोबर २०१५नंतर बार्सिलोनाने २९ सामन्यांत ८७ गोलचा पाऊस पाडला, तर केवळ १५ गोल स्वीकारले.