* मेस्सी, नेयमार, सुआरेझचा करिश्मा
* रिअल सोसिएडॅडवर ४-० असा विजय
बार्सिलोनाने ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेतील चार गुणांची आघाडी राखत अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात बार्सिलोनाने लिओनेल मेस्सी, नेयमार आणि लुईस सुआरेझ या त्रिकुटाच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर रिअल सोसिएडॅडवर ४-० असा विजय साजरा केला. दुसरीकडे अ‍ॅटलेटिको माद्रिदने १-० अशा फरकाने इस्पॅनिओलवर विजय मिळवून युरोपियन विजेत्या बार्सिलोनावरील दडपण कायम राखले आहे. बार्सिलोना ३३ गुणांसह अव्वल, तर अ‍ॅटलेटिको २९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून सावरत दोन महिन्यानंतर मेस्सी ला लीगा स्पध्रेत क्लबसह मैदानात उतरला होता. त्यामुळे बार्सिलोनाची ताकद आणखी वाढली. २२व्या मिनिटाला डॅनी अ‍ॅल्व्हेसच्या अप्रतिम पासवर नेयमारने बार्सिलोनाचे खाते उघडले. त्यानंतर ४१व्या मिनिटाला लुईस सुआरेजने ही आघाडी दुप्पट केली. ‘ला लिगा’ स्पध्रेतील सलग सहा सामन्यांत गोलधडाका करणाऱ्या सुआरेजने अ‍ॅल्व्हेसच्याच पासवर हा गोल केला.
मध्यंतराला बार्सिलोनाने २-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात ५३व्या मिनिटाला नेयमारने गोल करत सामन्याचे चित्र जवळपास स्पष्ट केले. नेयमार व सुआरेजनंतर भरपाईवेळेत मेस्सीने गोल करून बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.