ज्युव्हेंट्सचा अभेद्य बचाव; लढत गोलशून्य बरोबरीत

लिओनेल मेस्सी, ल्युइस सुआरेझ, नेयमार अशा एकापेक्षा एक दिग्गजांचा समावेश असलेल्या बार्सिलोनाचे चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ज्युव्हेंट्सचा अभेद्य बचाव भेदण्यात बार्सिलोनाला अपयश आले आणि लढत गोलशून्य बरोबरीत संपली. ३-० अशा सरासरीसह ज्युव्हेंट्सने उपांत्य फेरीत स्थान पटकावले.

२०१५मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत बार्सिलोनाने ज्युव्हेंट्सवर मात करतच जेतेपदाला गवसणी घातली. बुधवारी झालेल्या लढतीत विजयासह दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाची परतफेड केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल विश्वात मजबूत बचावासाठी ज्युव्हेंट्सचा संघ ओळखला जातो. एकापेक्षा एक आघाडीपटू असणाऱ्या बार्सिलोनाला एकही गोल करू न देता ज्युव्हेंट्सने बचावाची ताकद सिद्ध केली.

‘‘दोन लढतीत बार्सिलोनाला गोल करण्यापासून रोखणे यातूनच संघाच्या भक्कम बचावाची पातळी लक्षात येते. बार्सिलोनाच्या खेळाडूंनी सातत्याने गोलसाठी आक्रमण केले. मात्र ज्युव्हेंट्सच्या खेळाडूंनी बचावाचे महत्त्व अधोरेखित करताना बाजी मारली,’’ असे ज्युव्हेंट्सचे प्रशिक्षक मॅसिमिलानो अलेग्री यांनी सांगितले.

‘‘आम्ही सर्वसाधारण खेळ केला. त्याचा फटका आम्हाला बसला. ज्युव्हेंट्सने बचावपटूंची अभेद्य फळीच उभी केली,’’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक ल्युइस एन्रिक यांनी सांगितले. या हंगामाच्या अखेरीस एन्रिक संघाचे प्रशिक्षकपद सोडणार आहेत. या पराभवामुळे एन्रिक यांच्यावरील टीका तीव्र झाली आहे.

बार्सिलोनाचा आधारस्तंभ असलेल्या मेस्सीने केलेला गोलचा प्रयत्न ज्युव्हेंट्सचा गोलरक्षक गिआनल्युइगी बफनने रोखला. ल्युइस सुआरेझ आणि नेयमार यांनीही गोलसाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र ते विफलच ठरले. गोन्झालो हिग्युेनने मिळालेल्या सुरेख पासचा उपयोग करत गोलचे प्रयत्न केले मात्र ज्युव्हेंट्सचे बचावपटू आणि गोलरक्षकांनी चिवटपणे खेळ करत हे प्रयत्न हाणून पाडले.

गेल्या तीन वर्षांत दोन वेळा ज्युव्हेंट्सने चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठली आहे. २०१२-१३ हंगामानंतर पहिल्यांदाच बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या बादफेरीत गोल करता आलेला नाही. या स्पर्धेच्या ४६ लढतीत ज्युव्हेंट्सचा गोलरक्षक बफनने गोल होऊ दिलेला नाही. १९९६मध्ये ज्युव्हेंट्सने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

मोनॅकोचा बोरुसियावर दिमाखदार विजय

मोनॅको : क्यालिन बप्पे, राडमेल फालको आणि व्हॅलरे जर्मेन या तिघांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर मोनॅकोने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बोरुसिया डॉर्टमंडवर मात केली. हा विजय आणि ६-३ सरासरीच्या आधारे मोनॅकोने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले. २००४ नंतर पहिल्यांदाच मोनॅकोने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

बप्पेने तिसऱ्याच मिनिटाला गोल करत मोनॅकोचे खाते उघडले. १७व्या मिनिटाला फालकोने गोल करत मोनॅकोची बाजू भक्कम केली. मध्यंतरानंतर लगेचच बोरुसियातर्फे रेयुसने गोल केला. ८१व्या मिनिटाला जर्मेनने मोनॅकोसाठी गोल केला. उर्वरित वेळेत मोनॅकोने चेंडूवर नियंत्रण ठेवत बोरुसियाला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. गोल होण्यासाठी आवश्यक असे सहा सुरेख पास देणाऱ्या थॉमस लेमरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

गेल्या आठवडय़ात बोरुसिया संघाच्या बसवर बॉम्बहल्ला झाला होता. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या हल्ल्यात संघाचा बचावपटू मार्क बारत्रा दुखापतग्रस्त झाला होता. या हल्ल्यामुळे बोरुसियाची लढत पुढे ढकलण्यात आली होती.